भांडुपमधील त्रस्त नागरिकांकडून अनोखा निषेध, कंत्राटदाराचा 'वेळकाढू प्रशासन' प्रमाणपत्र देऊन सत्कार
अनेक महिन्यांपासून एकाच वेळी परिसरातील अनेक रस्त्यांची विकास काम सुरु करुन ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन भांडुपमधील नागरिकांनी जाहीर सत्कार केला.
मुंबई : सरकार, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका कायमच सामान्यांना बसतो. त्यामुळेच 'सरकारी काम अन् बारा महिने थांब' ही म्हण प्रचलित झाली असावी. भांडुपमधील नागरिकांनी कामामध्ये वेळकाढू करणाऱ्या कंत्राटदाराचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. अनेक महिन्यांपासून एकाच वेळी परिसरातील अनेक रस्त्यांची विकास काम सुरु करुन ती वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन भांडुपमधील नागरिकांनी जाहीर सत्कार केला.
भांडुपच्या कोकणनगर, प्रतापनगर तसेच सह्याद्रीनगर या परिसरांमध्ये एकाचवेळी रस्त्यांवर विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना या रस्त्यांवरुन धड चालताही येत नाही. त्यात रस्त्यांवरच खोदकाम सुरु असल्यामुळे वाहने देखील या परिसरांमध्ये पोहोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपात्कालीन परिस्थितीत एखादी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाचा बंब देखील या परिसरात पोहोचू शकत नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून या रस्त्यांवर सिव्हरेज लाईनसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आज एक अनोख आंदोलन केलं.
रस्त्यांची काम करणाऱ्या कंत्राटदाराला बोलावून या परिसरात त्याचा शाल आणि श्रीफळ तसेच 'वेळकाढूपणा प्रशासन' प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . निवडणुका जवळ आल्या की अशा विकासकामांचा योग हा प्रत्येक शहरात सुरु होतो. परंतु या विकास कामांमुळे नागरिकांना दिलासा कमी आणि मनस्तापच जास्त होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी इथल्या नागरिकांनी दिली.
काम अंतिम टप्प्यात असताना असे स्टंट केले जातात : नगरसेवक उमेश माने संबंधित काम हे गेले सहा महिने सुरु आहे. मात्र आताच काही जण त्यात राजकारण करत आहेत. हे नागरिक नाही तर माझा विरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक लोक आहेत. आता काम अंतिम टप्प्यात असताना असे स्टंट केले जात आहेत. कारण याचे श्रेय मला आणि शिवसेना पक्षाला मिळणार आहे म्हणून हे असे स्टंट केले जात आहेत. या मार्गाला पर्यायी मार्ग आहेत आणि जे रस्ते खोदलेलले आहेत ते दोन तीन दिवसात आता पूर्ण होऊन डांबरीकरण ही होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक उमेश माने यांनी दिली.