Parambir Singh : परमबीर सिंह यांच्यावर तिसरा गुन्हा ठाण्यात दाखल, काय आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे परमबीर सिंग यांच्यावर दाखल झाले आहेत.
ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे परमबीर सिंग यांच्यावर दाखल झाले आहेत. केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान आणि रियाज भाटी यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काल तिघांचा ठाणे पोलिसांनी जवाब नोंदवून परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण 28 जणांची नवे आहेत. त्यात 8 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाचा समावेश तर कुख्यात गुंड रवी पुजारी याचे देखील नावं आहे.
परमबीर सिंह आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारखे दहाहुन अधिक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा,राजकुमार कोथमिरे,एसीपी एन टी कदम, तसेच दोन पोलीस शिपाई यांच्यासह इतर दोघांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान, रियाज भाटी यांचा गेल्या 3 दिवसापासून संघर्ष सुरू होता. आपल्याला न्याय मिळाला आहे आणि हा न्यायव्यवस्थेचा विजय आहे असे यावेळी सोनू जलान यांनी म्हटले आहे.
याआधीही ठाण्यात एक गुन्हा दाखल
याआधी परमबीर सिंह आणि ठाण्यात काही वर्ष गुन्हे शाखेचे उपायुक्त राहिलेले पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याविरोधात खंडणीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खंडणीच्या गुन्ह्यात नंतर परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होता. शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ 5 मध्ये येणाऱ्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि पराग मनेरे यांच्यासह आणखी तीन जणांवर विविध कलमांचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या प्रमाणेच ठाण्यात देखील विविध खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त पराग मणेरे, संजय पूनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांनी खंडणी घेतली असल्याचे तक्रारदार शरद अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले होते.
परमबीर सिंह (Parambir Singh) आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह येथे परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.