BMC : मुंबईत ज्या दुकानांच्या पाट्या मराठीत नाहीत त्यांना पुढील आठवड्यापासून दणका, बीएमसी प्रशासन धडक कारवाई करणार
राज्य सरकारने आदेश काढल्यानुसार अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदललून मराठी केले आहेत. मात्र, अजूनही अनेक दुकानांचे नामफलक मोठ्या इंग्रजी अक्षरातच आहेत.
मुंबई : मुंबईतील ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांवर आता पुढील आठवड्यापासून महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला आहे, त्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.
राज्य सरकारने आदेश काढल्यानुसार अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदललून मराठी केले आहेत. मात्र, अजूनही अनेक दुकानांचे नामफलक मोठ्या इंग्रजी अक्षरातच आहेत. आजच्या मुदतीनंतर महापालिका प्रशासन पुढील एका आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करुन कारवाई करणार आहे.
सुमारे साडे चार लाख दुकाने पालिकेच्या रडारवर
दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल,तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय १७ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आला. तसंच महापालिकेनंही परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने तसेच आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते.
कारवाई कशी होणार ?
- पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार
- पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व अस्थापना कायद्यान्वये कारवाई
- नामफलक मराठीत नसल्यास पालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार
- नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई
तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते,अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन)अधिनियम २०१७ च्या तरतुदीनुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या