(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब निष्ठावंत कसे?', रामदास कदमांचे गंभीर आरोप
Shiv Sena Leader Ramdas Kadam allegation on Anil Parab : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Shiv Sena Leader Ramdas Kadam allegation on Anil Parab : शिवसेनेतील अंतर्गत कलहाला अखेर वाचा फुटली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी परिवहन नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं की, अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहेत. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे संजय कदम यांना ते मातोश्री वरती घेऊन गेले पण उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाही. योगेशने दोन वर्ष फोन केले मात्र एकही कॉल त्यांनी उचलला नाही, असं ते म्हणाले.
रामदास कदम म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत होता म्हणून तो पाडला गेला. काही कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणा केली. त्यांच्या मागे कोण होतं हे मला माहित होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो मी कधीच किरीट सोमय्या यांच्याशी बोललो नाही. मी कधीही पक्षाच्या विरोधात काम केलं नाही.
रामदास कदम म्हणाले की, तीन चार महिन्यापासून माझ्या संदर्भात मीडिया संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु आहे. माझी भूमिका सर्वांना माहीत व्हावा म्हणून माझी बाजू मांडत आहे. मला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा संपर्क नाही. मी त्यांच्या हॉटेलवर बोललो म्हणून मी पक्षाच्या विरोधात बोललो नाही, असं ते म्हणाले. अनिल परबांनी मुंबईतून निवडून येऊन दाखवावं. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून ते राष्ट्रवादीच्या संजय कदमांना मातोश्रीवर घेऊन आले. मात्र उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यावर सुडाची भावनेनं काम केलं, असं ते म्हणाले.
रामदास कदम म्हणाले की, संजय कदम यांना मी मोठं केलं. पण त्याने पक्ष सोडल्यानंतर भगवा झेंडा पायाखाली तुडवून जाळला. त्यांना आता हाताशी धरलं जात आहे. आमचे निष्ठावंत उदय सामंत यांना बोलावलं. आता आम्हाला त्यांच्याकडून निष्ठा शिकावी लागत आहे. अनिल परब शिवसेनेला गहाण ठेवत आहेत. मग गद्दार कोण आहे, असा सवाल त्यांनी केला. एसटी कर्मचारी संप सुरु आहे आणि आत्महत्या होत आहेत. पण अनिल परब यांना वेळ नाही. अनिल परब यांची भाषा अशी आहे की ते राष्ट्रवादी नेता म्हणून बोलत आहेत. शिवसेना म्हणजे काय हे आता आम्हाला उदय सामंत सांगत आहेत. 52 वर्ष आम्ही या पक्षासाठी खर्च केले आहे, असं ते म्हणाले.
कदम म्हणाले की, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध? माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे मला सगळे माहित आहे, असं ते म्हणाले.