एक्स्प्लोर
आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिनच्या अश्रूंचा बांध फुटला!
रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (2 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते.
मुंबई : सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. सरांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिन तेंडुलकर अतिशय भावुक झालेला दिसला. आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनच्या अश्रूंचा बांध फुटला.
रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी (2 जानेवारी) मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी सचिन तेंडुलकर सकाळपासून तिथेच उपस्थित आहे. त्याच्यासह अनेक नामवंत व्यक्ती अंत्यविधीला उपस्थित आहेत.
दरम्यान, रमाकांत आचरेकर सरांच्या कर्तृत्वाचा कदाचित सरकारला विसरला पडला आहे. कारण पद्म पुरस्कार विजेत्या आचरेकर सरांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही, क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी
सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यासारख्या क्रिकेटपटूंनी आचरेकर सरांकडून क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. 2010 मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी 1990 साली त्यांना मानाच्या द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं.
सचिनच्या भावना
'आचरेकर सरांच्या उपस्थितीने आता स्वर्गातील क्रिकेटही समृद्ध होईल. आचरेकर सरांच्या अनेक शिष्यांप्रमाणे मीही त्यांच्या हाताखाली क्रिकेटची बाराखडी गिरवली. माझ्या आयुष्यातील त्यांचं योगदान शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही. त्यांनी रचलेल्या पायावर मी आज उभा आहे. गेल्याच महिन्यात मी आचरेकर सरांना त्यांच्या काही शिष्यांसोबत भेटलो होतो. आम्ही एकत्र वेळ घालवला आणि जुन्या आठवणीत रमताना हास्यविनोदही केले. आचरेकर सरांनी आम्हाला आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये कायमच सरळमार्गाने खेळायला शिकवलं. आचरेकर सर, तुम्ही आम्हाला तुमच्या आयुष्याचा भाग केलंत आणि समृद्ध केलंत, त्याबद्दल आभार. वेल प्लेड सर. तुम्ही जिथे असाल, तिथे अनेकांना समृद्ध करा' अशा भावना सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या आहेत.
आचरेकर सरांची कारकीर्द
आचरेकर सरांचा जन्म सिंधुदुर्गातील मालवणमध्ये 1932 साली झाला. वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे 1943 सालापासून त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द अधिक गाजली.
1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आचरेकर सर केवळ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकेचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता.
आचरेकर गुरुजींनी शिवाजी पार्कात कामत मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. या क्लबचं कामकाज आता त्यांची कन्या आणि जावई पाहतात.
भीष्माचार्यांनी घडवले खंदे क्रिकेटपटू
आचरेकर सरांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, संजय बांगर, बलविंदर संधू, रमेश पोवार यासारखे अनेक खेळाडू घडवले. त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरुन योगदान दिलं. 'रमाकांत आचरेकर : मास्टर ब्लास्टरचे मास्टर' हे चरित्र पत्रकार कुणाल पुरंदरे यांनी लिहिलं आहे.
संबंधित बातम्या
आचरेकर सरांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरच्या भावना
सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन
सचिनप्रमाणे माझ्या कारकीर्दीतही आचरेकर सरांची साथ : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement