(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मलिष्काचं नवं गाणं, 'गेली गेली मुंबई खड्ड्यात...'
आरजे मलिष्काने पुन्हा एकदा एका गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. यावेळी मलिष्काने 'सैराट' सिनेमातील 'झिंगाट..' गाण्याचा आधार घेतला आहे.
मुंबई : आरजे मलिष्काने पुन्हा एकदा नव्या गाण्याच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. यावेळी मलिष्काने 'सैराट' सिनेमातील 'झिंगाट..' गाण्याचा आधार घेतला आहे. मलिष्काने सोशल मीडियावर हे गाणं लाईव्ह करत बीएमसी आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईत काही दिवस सलग पाऊस झाल्यानंतर अनेक रस्ते पाण्य़ाखाली गेले होते. तर अनेक दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडले. या सगळ्याला उद्देशून मलिष्काने हे नवं गाणं रिलीज केलं. या गाण्यातून तिने अप्रत्यक्षरित्या मुंबई महापालिका, सरकारवर टीका केली. या गाण्यातून मलिष्कानं गेली मुंबई पाण्याखाली आणि खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असं भाष्य केलं.
सैराट सिनेमातील 'झिंग झिंग झिंगाट..' गाण्याच्या चालीवर मलिष्कानं 'गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणं तयार केलं आहे. सध्या हे गाणं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
The new monsoon song telling it like it is in Mumbai city has just been released on my show @RedFM_Mumbai . Till then check if this song sings our plight right:) Would you like a video too????? @RedFMIndia pic.twitter.com/0ocUGsrhNt
— Mumbai Ki Rani (@mymalishka) July 17, 2018
गेल्यावर्षी मलिष्काने 'सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय?' या गाण्याच्या चालीवर भन्नाट गाणं तयार केलं होतं. या गाण्यातून मलिष्काने मुंबईतल्या समस्या आणि मुंबईचा पाऊस यावर भाष्य केलं होतं. मात्र बीएमसीतील सत्ताधारी शिवसेनेला मलिष्काचं गाणं जिव्हारी लागल्यानं यावरुन मोठं वादंग उठलं होतं. या पार्श्वभूमीवर मलिष्काच्या नव्या गाण्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.