फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; कुणालाही ऑनलाइन मद्य विक्रीची परवानगी नाही : सरकार
कुणालाही ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलं आहे.
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोणालाही ऑनलाइन मद्य विक्री करण्याचा परवाना दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी यासंदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व प्रकारची मद्याची दुकाने सध्या बंद आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी सोशल मीडियावर फसव्या जाहिराती देऊन ग्राहकांची फसवणूक करत आहे. या फसव्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा फसव्या जाहिरात देणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
ऑनलाईन वाईन किंवा ऑनलाईन लिकर या मथळ्याखाली घरपोच मद्य सेवा दिली जाईल, अशा प्रकारच्या फेक मेसेजद्वारे सोशल मीडियावर फसव्या जाहिराती दिल्या जात आहेत. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल असे सांगून चोरट्यांकडून फसवणूक केली जात आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन झालेला आहे. राज्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई सुरू आहे.
Coronavirus | राज्यात आज 187 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 1761 वर
दोन हजार 281 गुन्ह्यांची नोंद यासंदर्भात राज्यात शुक्रवारी 147 गुन्हे नोंदविण्यात आले असून 66 जणांना अटक करण्यात आली आहे. 11 वाहने जप्त करण्यात आली असून 30 लाख 48 हजार किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच 24 मार्च ते 10 एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात दोन हजार 281 गुन्हे नोंदविण्यात आले असून 892 जणांना अटक करण्यात आली आहे. 107 वाहने जप्त करण्यात आली असून 5.55 कोटी रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सावधान! सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी सरकारकडून मार्गदर्शिका; नियम तोडल्यास कारवाई
अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी हेल्पलाईन अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24×7 सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18008333333 तर व्हाट्सॲप क्रमांक 8422001133 आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Health Minister on #Lockdown | लॉकडाऊन गांभीर्याने घेतला नाही तर 30 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे