प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
विरोधी पक्षांनी दबाव आणल्याशिवाय अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी होऊन अजितदादांना न्याय मिळणार नाही.

मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुन्हा दिल्ली दौरा करत देशातील विविध पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सखोल तपास, व्हीएसआर कंपनीवर कारवाई आणि डीजीसीएसच्या अहवालाच्या अनुषंगाने ते विविध पक्षाच्या खासदारांच्या भेटी घेऊन संसदेत यासंदर्भाने आवाज उठवण्याची मागणी करत आहेत. व्हीएसआर कंपनीचे मालक आणि प्रफुल पटेल यांचे जवळचे संबंध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, प्रफुल पटेल (Praful patel) यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केलीय. आता, याप्रकरणी, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील (Anil Patil) यांनी रोहित पवारांवर पलटवार केला आहे.
विरोधी पक्षांनी दबाव आणल्याशिवाय अजितदादांच्या संशयास्पद विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी होऊन अजितदादांना न्याय मिळणार नाही. त्यामुळेच देशभरातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटून कोणत्याही परिस्थितीत कुणाच्याही दबावाशिवाय ही चौकशी होण्यासाठी या प्रश्नी आवाज उठवण्याची विनंती त्यांना करतोय, असे रोहित पवार यांनी म्हटले. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेटही त्यांनी घेतली. आता, रोहित पवारांच्या या भेटीवर आणि दौऱ्यावर आमदार अनिल पाटील यांनी पलटवार केला आहे.
रोहित पवार केवळ राजकारण करत आहेत, केवळ प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा त्यांनी उचित ठिकाणी जाऊन पुरावे सादर करावेत, उगाच इकडे-तिकडे करू नये, अन्यथा महाराष्ट्राचा पप्पू होण्याची वेळ त्यांच्यावर येईल, अशा शब्दात अनिल पाटील यांनी रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य केलं. तसेच, प्रफुल पटेल हे व्ही.के. सिंगच्या मुलाच्या लग्नाला गेलेचे नव्हते, मी दाव्यानिशी सांगतो. उगाच त्यांना बदनाम करण्याचा कुणी प्रयत्न करू नये, असे म्हणत रोहित पवारांच्या प्रश्नाला पाटील यांनीच उत्तरही दिले.
मुख्यमंत्र्यांना भेटणार
दरम्यान, अजित दादांच्या विमान दुर्घटनेबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे, आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत आणि चौकशीची मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शशिकांत शिंदेंचा सवाल
विधानसभेत नियम 97 वय अन्वये आम्ही अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भाने चर्चा करण्याबाबत आपल्याला विनंती करत आहोत. मागील 4 दिवसांपासून आपल्याला विनंती करतो आहोत. मात्र, अद्याप चर्चेला परवानगी दिली जात नाही, यांच्यावर नेमका कुणाचा दबाव आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला.
हेही वाचा
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?






















