ST संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव, गुणरत्न सदावर्तेंचा हायकोर्टात धक्कादायक दावा
एसटी संपाचा आजचा 16 वा दिवस आहे. 'कामगारांच्या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून पाठींबा मिळतोय. 'आंदोलन शांततापूर्ण आणि कोर्टाच्या आदेशांचं पालन करूनच सुरू आहे, असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
मुंबई : एसटी संपात (ST Strike) नक्षलवादी चळवळीचा (Naxal) शिरकाव झाल्याचा धक्कादायक दावा संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) यांनी केला. एस.टी. महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात (High Court) याचिका दाखल आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला. गुणरत्न सदावर्ते न्यायमूर्तींना म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात नक्षलवादी चळवळ घुसले आहेत. त्यामुळे या गोष्टीची दखल तातडीने घेऊन, तुम्ही या गोष्टीची माहिती लवकरात लवकर पोलिसांना द्या"
एसटी संपाचा आजचा 16 वा दिवस आहे. 'कामगारांच्या आंदोलनाला समाजातील विविध स्तरातून पाठींबा मिळतोय'. 'आंदोलन शांततापूर्ण आणि कोर्टाच्या आदेशांचं पालन करूनच सुरू आहे, असंही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
हायकोर्ट काय म्हणाले?
कोरोनाकाळात बंद असलेल्या शाळा आता सुरू होतायत, खेडेगावातील विद्यार्थ्यांनी काय करायचं? अशी विचारणा हायकोर्टाने केली. कामगारांनी संप सुरू ठेवताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होतंय, याचाही विचार करावा असंही कोर्टाने सुनावलं.
सरकारची बाजू काय?
दरम्यान आजच्या सुनावणीत सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. "प्रत्येक संपकरी संघटना स्वतंत्रपणे समितीसमोर आपली बाजू मांडणार आहेत", असं राज्य सरकारकडून हायकोर्टात सांगण्यात आलं.
संपकाळात कामावर येऊ इच्छिणा-या कामगारांना संपक-यांनी आडकाठी केली. अशी महामंडळाची तक्रारही हायकोर्टाकडे करण्यात आली. मात्र अशी घटना घडल्याचं संपकरी कामगार संघटनेनं नाकारलं.
शरद पवार अनिल परब बैठक
दरम्यान, एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी, माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. अनिल परब यांनी एसटी संप, संपकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारची भूमिका, कायदेशीर बाबी याबाबतची माहिती दिली.
अनिल परब काय म्हणाले?
गेले काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. आज मला शरद पवार साहेबांनी बोलावलं होतं, अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा केली. पवारसाहेबांना सर्व माहिती दिली. याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबत चर्चा झाली.
विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु. हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल. पण त्यासमोर आपण काय बाजू मांडायची याबाबत आज सविस्तर पवार साहेबांसोबत चर्चा झाली.
पगारवाढ किंवा खासगीकरण असा विशेष मुद्दा काही चर्चचा विषय नाही, काही चर्चा बाहेर सांगण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोघांचं समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा, तशी चर्चा या बैठकीत झाली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे, असं अनिल परब म्हणाले.
संबंधित बातम्या
एसटी संप: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, 'या' मुद्यांवर झाली चर्चा
एबीपी माझा लाईव्ह टीव्ही