महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिका केलीय
मुंबई : राज्यातील बहुतांश मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी रोखण्यात आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यात भाजपला अपयश आलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अंतिम लढती निश्चित झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्यादिवशी अनेक मतदारसंघात बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, मावळ पॅटर्नची चर्चा जोरदार सुरू असून माजी नगरसेवक नाना काटे यांनीही माघार घेतली आहे. नाना काटे (Nana Kate) यांची बंडखोरी टाळण्यासाठी आज शरद पवार आणि अजित पवार फोनाफोनी केली होती. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नाना काटेंसोबत फोनवर संवाद साधला. त्यामुळे नाना काटे कोणता निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर नाना काटे यांनी आपली तलवार म्यान केल्याने चिंचवडमधील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, त्या बदल्यात भाजप महायुतीने मावळमध्ये युती धर्म पाळावा अशी अपेक्षा नाना काटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे. मात्र, मावळमधील भाजप ही सुनील शेळकेंविरुद्ध काम करणार असल्याचं बाळा भेगडेंनी म्हटलंय.
पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात भाजप नेते आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची भूमिका केलीय. त्यामुळे, बाळा भेगडेंनी सुनिल शेळकेंविरुद्ध शड्डू ठोकला असून बापू भेगडे यांच्या पाठिंब्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे, येथील मतदारसंघात मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मनसेनं आपली भूमिका जाहीर केली असून बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याबाबत पत्रक जाहीर केलं आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे पत्र शेअर करण्यात आलं आहे. ''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणूकीत 204 मावळ विधानसभेचे उमेदवार अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर पाठींबा देत आहेत. मावळ विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी याची नोंद घ्यावी, ही विनंती,'' अशा आशयाचे पत्रकच मनसेच्यावतीने काढण्यात येणार आहे.
सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने मावळ विधानसभेतील उमेदवार अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठींबा जाहीर केला आहे.#विधानसभा_२०२४ pic.twitter.com/NIAQR8AhW6
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) November 5, 2024
शेळकेंविरुद्ध बाळा भेगडेंची ठोकला शड्डू
पिंपरी चिंचवडमध्ये नाना काटेंनी बंडखोरी मागे घेताना मावळ पॅटर्नमधून भाजपने पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. पण हा दावा भाजप नेते बाळा भेगडेंनी खोडून काढला. अगदी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंचा प्रचार केला तरी स्थानिक भाजपा आमचे बंडखोर उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करणार, अशी आक्रमक भूमिका बाळा भेगडेंनी घेतली आहे. त्यामुळे, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतरही मावळमध्ये सुनील शेळकेंविरुद्ध भाजप काम करणार की शेळकेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार हे पाहावे लागेल.
मावळमध्ये संपूर्ण भाजप ताकदीने पाठीशी ठेवणार - फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना काटेंना फोन करुन संवाद साधला. त्यावेळी, मावळ पॅटर्न आणि सुनील शेळकेंसंदर्भात चर्चा केली. ''मी संपूर्ण भाजप त्यांच्यामागे उभी करतोय, पण जे आपल्याला सोडून गेले आहेत, त्यांची मी तुम्हाला गॅरंटी देत नाही. मी स्वत: जात आहेत, सुनीलला माहितीय मी किती प्रयत्न केले, स्वत: बावनकुळे साहेब 4 तास तिथं बसून होते. मात्र, ते ऐकायला तयारी नाहीत. पण, मी भाजपची ताकद सुनील शेळकेंच्या पाठीशी उभी करतोय,'' असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मावळ पॅटर्न हाणून पाडण्यासंदर्भात व महायुतीचा धर्म पाळण्याबाबत नाना काटेंना आश्वस्त केलं.