(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसटी संप: शरद पवार आणि अनिल परब यांच्यातील बैठक संपली, 'या' मुद्यांवर झाली चर्चा
st workers strike updates: राज्यात सुरू असलेल्या एसटी संपाबाबत शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक पार पडली.
ST Workers Strike Updates : मागील 15 दिवसापासून सुरू असलेल्या एसटी संपाबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. एसटीच्या संपामुळं शाळेत जाणाऱ्या मुलांचे आणि ग्रामीण भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या बैठकीत एसटी कर्मचारी आणि त्यांचे प्रश्न, त्यांच्या वेतवाढीचा विषय, इतर राज्यांमध्ये कसं ट्रान्सपोर्ट चालतं त्यांचे पगार काय आहेत? या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
अनिल परब काय म्हणाले?
मागील काही दिवस एसटी संप सुरु आहे, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे हाल होत आहेत. आज मला शरद पवार यांनी बोलावलं होतं. अधिकारी आणि आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. यातून काय मार्ग निघू शकतो, संप कसा मिटू शकतो त्याबाबत प्रयत्न करण्याबाबत, एसटीची आर्थिक परिस्थिती, एसटी रुळावर कशी येईल, संपकऱ्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर चर्चा झाली. शरद पवार यांना सर्व माहिती दिली. याबाबतीत वेगवेगळे पर्याय कसे काढता येतील, मार्ग काढून कामगार आणि जनतेचं समाधान करता येईल याबाबतही चर्चा झाली.
विलिनीकरणाबाबत काय म्हणाले परब?
विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समिती समोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु. हा अहवाल हायकोर्टाच्या समितीच्या माध्यमातूनच येईल. पण त्यासमोर आपण काय बाजू मांडायची याबाबत आज सविस्तर पवार साहेबांसोबत चर्चा झाली.
मध्यममार्ग निघावा
पगारवाढ किंवा खासगीकरण असा विशेष मुद्दा काही चर्चचा विषय नाही, काही चर्चा सार्वजनिक करण्यासारख्या नाहीत, ठाम भूमिका कोणीही घेऊन चालणार नाही, दोन्ही बाजूचे समाधान कसं होईल असा मध्यम मार्ग काढायला हवा आणि तशी चर्चा या बैठकीत झाली. हा संप लवकरात लवकर संपावा, यात कर्मचारी आणि प्रवासी दोघांचंही नुकसान होत आहे असेही अनिल परब यांनी म्हटले.