मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 28 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर 28 फेब्रुवारीला परीक्षा पार पडणार आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी 28 जानेवारी, 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पेट परीक्षेचे आयोजन 28 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात येणार असल्याचे नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच ज्या इच्छूकांनी फेब्रुवारी आणि मार्च 2020 ला ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नसून त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्च 2002 दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 6512 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातून 6051 तर इतर राज्यातून 461 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 1148, मानव्यविद्या 1691, आंतरविद्याशाखा 333 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 3340 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. तर एमफील प्रवेश परीक्षेसाठी 326 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. ज्यामध्ये महाष्ट्रातून 227 आणि इतर राज्यातून 49 अर्ज प्राप्त झाले.