(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai News : कर्जबाजारी झालेल्या मुंबईच्या हिरे व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, गेट वे ऑफ इंडियाजवळून समुद्रात उडी
Mumbai News : कर्जबाजारी झालेल्या हिरे व्यापाऱ्याने गेट वे ऑफ इंडिया जवळून समुद्रात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुंबई : कर्जबाजारी झालेल्या हिरे व्यापाऱ्याने रविवारी गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) जवळून समुद्रात (Sea) उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय शहा (Sanjay Shah) असे या मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा हिऱ्यांचा व्यवसाय होता. व्यवसायात तोटा झाल्याने ते गेले काही दिवस नैराश्यात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय शहा हे महालक्ष्मी परिसरात कुटुंबासह राहत असून त्यांचे वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स इमारतीत कार्यालय आहे. रविवारी पहाटे ते फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. सुरुवातीला त्यांनी टॅक्सीने सागरी सेतू गाठत तेथे निर्माल्याचे विसर्जन करायचे आहे, असे सांगत टॅक्सीचालकाला थांबण्याची विनंती केली होती.
गेट वे ऑफ इंडिया जवळून समुद्रात उडी
मात्र वाहतूक पोलीस दंड आकारतील, म्हणून चालकाने तेथे गाडी थांबवली नाही. त्यानंतर ते गेट वे ऑफ इंडिया जवळ आले. संजय शहा हे टॅक्सीतून गेट वे ऑफ इंडियाजवळ उतरले. त्यानंतर चालकाला काही समजायच्या आतच त्यांनी समुद्रात उडी घेतली. चालकाने याबाबत तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
हिरे व्यापाऱ्याचा मृत्यू
खवळलेल्या समुद्रात दोरखंड बांधून उतरलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी संजय शहा यांना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी संजय शहा यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या