नरेंद्र पाटलांची उचलबांगडी केल्याने माथाडी कामगार आक्रमक, APMC मार्केट बंद
नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून उचलबांगडी केल्यानंतर माथाडी कामगार वर्ग आक्रमक झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर एपीएमसी अचानक बंद करण्यात आल्याने व्यापारी वर्गात नाराजीचा सूर होता.
नवी मुंबई : नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून उचलबांगडी केल्यानंतर माथाडी कामगार वर्ग आक्रमक झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी आंदोलन करत मार्केट बंद पाडले आहे. भाजीपाला आणि फळ मार्केट सोडून इतर तीन मार्केट मधील व्यवहार माथाडी कामगारांनी बंद केले. कांदा - बटाटा, मसाला, दाना असे तीन मार्केट सकाळी बंद करण्यात आले होते.
दिवाळीच्या तोंडावर एपीएमसी अचानक बंद करण्यात आल्याने व्यापारी वर्गात नाराजीचा सूर होता. कोरोनामुळे आधीच व्यवसायाचे नुकसान झाले असताना आता परत मार्केट बंद केल्यास व्यापारी, शेतकरी वर्गाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. व्यापारी वर्गाची नाराजी पाहता दोन तास बंद केलेले मार्केट पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले. नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून उचलबांगडी करण्यात आल्याने मराठा समाजाचे नुकसान झाले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या नरेंद्र पाटील यांची परत एकदा महामंडळावर नियुक्ती करावी अशी मागणी माथाडी कामगारांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात नरेंद्र पाटील यांनी सरकारवर जहरी टीका केली होती. भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती तेव्हा राज्यात मूक मोर्चे काढण्यात आले. मात्र कुणालाही अडवण्यात आले नाही. आज तुम्ही कोल्हापूरमध्ये परिषद घेतली की अडवता. पंढरपूरमध्ये मशाल मोर्चा काढला त्यांना आडवता, का तुमची फाटली आहे का? अशा शब्दात उपस्थित नरेंद्र पाटील यांनी सरकारवर टीका केली होती. शिवाय या सरकारने मराठा मुलांची इतकी गंभीर अवस्था केलीये की एमपीएससीच्या मुलांचे फोन येत आहेत. साहेब आम्ही जीव द्यावा म्हणून मला जर परवानगी असते तर तलवारीने तीन-चार जणांना मी भोसकलं असतं, असं गंभीर वक्तव्यही नरेंद्र पाटील यांनी केलं होतं.
दरम्यान, नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून हटवल्यानं जालन्यात मराठा बांधवांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून वेळोवेळी सरकार विरोधात भूमिका घेतली. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच बरखास्त केलं आहे. याचाच निषेध म्हणून शहरातील गांधी चमन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सरकारच्या आदेशाची होळी करण्यात आली. येत्या काळात महाविकास आघाडी सरकारला याचे गंभीर परिणाम भोगवे लागतील असा इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सरकारला देण्यात आला आहे.