'...तर सरकारच्या डोक्यात पंप घालू', वीजतोडणी विरोधात अधिवेशनात भाजपचा आक्रमक पवित्रा
कोरोना काळात संकटात आलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडलं जातं असा आरोप करत भाजपचे आमदार आज आक्रमक झाले आणि त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केलं.
मुंबई : कोरोना काळात संकटात आलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडलं जातं असा आरोप करत भाजपचे आमदार आज आक्रमक झाले आणि त्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. आज कामकाजाला सुरुवात होण्याच्या आधी वीजदरवाढीविरोधात भाजप आमदार राम सातपुते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी अंगावर बल्ब, वीजपंप लावून विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. यावेळी सातपुते म्हणाले, वीज दरवाढ कमी केली नाही तर वीजपंप सरकारच्या डोक्यात घालू.
आमदार राम सातपुते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांसोबत खाजगी सावकारांसारखे वागू नये. राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आणि दुसरीकडे अवकाळीने उद्धवस्थ झाला असं असताना महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे, असा आरोप राम सातपुते यांनी केला शेतकरी संकटात असताना एका दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट त्याला वाढीव वीजबिल पाठवले आणि आता पीक शेतात शेवटच्या पाण्याची वाट पाहत असताना मात्र राज्यतल्या लाखो शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज तोडणी सुरू केली आहे, शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर किमान खाजगी सावकारांसारखे तरी वागू नये असं राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.
'वीज तोडणी तात्काळ थांबवा', विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची महत्वाची घोषणा
राज्यातील शेतकरी-नागरिकांच्या वीजजोडणी कापण्याचा सपाटाच मविआ सरकारने लावला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला गरीब आणि मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त आहे.आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर याविरोधात जोरदार आंदोलन आम्ही केले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
आघाडी सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, हे मी वेळोवेळी सांगतोय. या सरकारने नागरिकांना आधी वाढीव वीज बिले दिली आणि आता सामान्य नागरिकांच्या वीज तोडणीसह शेतकऱ्यांच्या पंपांची देखील वीज तोडली जात आहे. हा सरळसरळ अन्याय आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले.वाढीव वीज देयकांच्या मुद्यावरून विधानपरिषदेत गदारोळ
वाढीव वीज देयकांच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानपरिषदेत केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत वीज देयकांच्या मुद्द्यावर तातडीने निर्णय घेण्याची आणि चर्चा करण्याची मागणी केली. कोविड महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे , मात्र जशी सरकारला आर्थिक चणचण आहे तशी चणचण शेतकरी आणि वीज ग्राहकांनाही आहे त्यामुळे राज्य सरकारने आवश्यतेनुसार कर्ज उभारवं आणि शेतकऱ्यांची विजदेयकं माफ करावी किंवा वाढीव वीज देयकात सवलत द्यावी अशी मागणी दरेकर यांनी केली.निर्णय होत नाही तो पर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये त्याचप्रमाणे वीज देयकांची खात्री करून नोटीस पाठविल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये असं ते म्हणाले. यासंदर्भात संबंधित मंत्र्यांनी उत्तर घ्यावं असं सभापतींनी सांगितलं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांच्या मुद्द्याची नोंद घेतल्याचं सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी हौद्यात उतरून फलक झळकावत घोषणाबाजी केली त्यामुळे सभापतींना कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं.