आमदार रमेश कदमला नियमबाह्य मदत केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस निलंबित
रमेश कदमला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले होते. मात्र तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले होते.
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ठाणे जेलमध्ये असलेल्या आमदार रमेश कदमला जेलमधून बाहेर काढल्याप्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वी कासारवडवली येथील वाघबीळ नजीकच्या पुष्पांजली सोसायटीतील एका घरातून सुमारे 53 लाख 46 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली होती. यावेळी त्याठिकाणी रमेश कदम देखील आढळून आला होता. रमेश कदमला जेलमधून बाहेर काढून खाजगी सोसायटीत घेऊन गेल्या प्रकरणी या पाच पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.
रमेश कदमला जेजे रुग्णालयात तपासणीसाठी ठाणे कारागृहातून नेण्यात आले होते. मात्र तपासणी झाल्यावर पुन्हा तुरुंगात नेण्याऐवजी पोलीस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्याला ओळखीच्या एका माणसाच्या घरी नेले होते. त्याच वेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. त्यामुळे रोख रक्कमेसह रमेश कदम आणि एक व्यक्ती पोलिसांना सापडला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेला रमेश कदम यंदा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे.
VIDEO | काय आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाचा महाघोटाळा? संबंधित बातम्या