जनतेनं राज्य दिलं, तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी करा : देवेंद्र फडणवीस
मंत्रिमंडळ विस्तारावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख मिळत आहे. आता अखेरीस मंत्रिमंडळ विस्तारासाठी 30 डिसेंबरची तारीख ठरली आहे.
कल्याण : राज्याच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. जनतेने निवडून दिले आहे तर किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
बदलापुरात आयोजित अटल संध्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी आज हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. हे सरकार विरोधाभासाने तयार झालेलं असून त्यामुळे सरकार चालवण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे, की इतके दिवस मंत्रिमंडळ तयार झालेलं नाही. तुम्हाला जनतेनं राज्य दिलं आहे, तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी करा, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी 30 डिसेंबरची तारीख
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला तारीख पे तारीख मिळत आहे. आता अखेरीस मंत्रिमंडळ विस्तारासाठी 30 डिसेंबरची तारीख ठरली आहे. मंत्रिमंडळ विस्तार 23 किंवा 24 डिसेंबरला होईल असा बोललं जात होतं, मात्र ती तारीखही हुकली आहे. मात्र आता 30 डिसेंबरला खरंच मंत्रिमंडळ विस्तार होणार की पुन्हा नवीन तारीख मिळणार हे पाहावं लागणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून कुणाला संधी द्यायची याबाबत निर्णय न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार टळल्याची चर्चा सुरु आहे. तर राष्ट्रवादीला गृह किंवा नगरविकास खात हवं आहे. ही दोन्ही खाती सध्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे या खात्यांबाबत अजून निर्णय झाला नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर गेला आहे, अशी देखील चर्चा आहे.
शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
संबंधित बातम्या
- राष्ट्रवादीत तरुण आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी चुरस, कुणाला संधी मिळणार?
- ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त
- समर्थक आमदारांना मंत्रीपदं मिळावीत यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी; 'ही' नावे चर्चेत
- सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल : अजित पवार
- महाविकास आघाडीचं तात्पुरतं खातेवाटप जाहीर!