Coronavirus | बेस्टच्या एकूण 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, एकाचा मृत्यू
मुंबईतील महत्त्वाच्या बेस्ट सेवेतील 15 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये चालक, कंडक्टर यांच्यासह विद्युत आणि अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या साथीच्या रोगाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची राजधानी मुंबईला बसला आहे. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या एकूण 5776 वर पोहोचली असून 219 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे आरोग्य, पोलीस यांच्यापाठोपाठ मुंबईतील बेस्ट सेवेतही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे या 15 पैकी 4 जणांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री अथवा प्रतिबंधित क्षेत्रातला संपर्क नाही. बेस्टच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये बेस्टमधील विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सात कंडक्टर आणि चार चालक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय बेस्टच्या विद्युत विभागातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा आधीच मृत्यू झाला आहे. तर परिवहन अभियांत्रिकी विभागातील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
आतापर्यंत बेस्टचा 250 जणांचा स्टाफ क्वॉरन्टाईन करण्यात आला आहे. त्यापैकी 150 जणांचा 14 दिवसांचा क्वॉरन्टाईन कालावधी संपला आहे. मेडिकल फिटनेस बघून क्वॉरन्टाईन कालावधी संपल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
आतापर्यंत 7500 कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. रजेनंतर कामावर रुजू होणाऱ्या 250 जणांचं सेल्फ डिक्लरेशनही घेण्यात आलं आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात बेस्ट बस ही मुंबईत सुरु असलेली एकमेव सार्वजनिक वाहतुकीची सेवा आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक सध्या बसमधून होत आहे. प्रत्येक बसमध्ये एक चालक आणि कंडक्टर असतो. काही वेळा एक अतिरिक्त सहाय्यक असतो.