(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Corona Vaccination | एकही लस उपलब्ध नाही, ठाण्यातील लसीकरण ठप्प
ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणि महापालिकेच्या पाच केंद्रावर लसीकरण सुरु असतानाच साठा संपला. परिणामी ठाण्यातील लसीकरण ठप्प झालं आहे.
ठाणे : एकीकडे बेड मिळेना, ऑक्सिजन मिळेना आणि इंजेक्शन मिळेना तरीही ठाणेकरांचे लसीकरण मात्र सुरु होते. तर शुक्रवारी (23 एप्रिल) ठाण्यातील लसीकरण केंद्रे देखील दुपारी 12 वाजताच साठा संपल्याने बंद करण्यात आली. ठाण्यात शुक्रवारी लसींचा साठा शून्य होता. त्यामुळे लसीकरणासाठी मोठी गर्दी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालय आणि पालिकेच्या पाच लसीकरण केंद्रावर दिसली. तसेच लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होताना दिसली.
ठाण्यात पालिकेच्या वतीने विविध लसीकरण केंद्रांवर कोवॅक्सिन आणि कोविशील्ड लस देण्यात येत होते. तर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातही लसीकरण सुरु होते. शुक्रवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात आणि पालिकेच्या पाच केंद्रावर लसीकरण सुरु असतानाच लसींचा साठा संपल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवारी ठाण्यातील पाच ठिकाणांपैकी चार ठिकाणी कोविशील्ड तर लोढा लुक्सएरिया, माजिवाडा पाईपलाईन येथील एका रुग्णालयात कोवॅक्सिन लस देण्यात येत होती. मात्र शुक्रवारी लसीकरणासाठी रांग असताना लसींचा साठा संपला. त्यामुळे नागरिक हैराण झाले. सद्यस्थितीला ठाणे पालिकेच्या लसीकरण सेंटरवर आणि ठाणे सिव्हिल रुग्णालयात साठ्याअभावी लसीकरणालाच ब्रेक लागल्याचे चित्र दिसत आहे.
ठाण्यात वाढते कोविड रुग्ण पाहता लसीकरणाची मोठी मोहीम पालिका आणि शासनाच्या माध्यमातून जोरात सुरु होती. ठाणे पालिकेच्या हद्दीतील जवळपास पाऊणे तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. जास्तीतजास्त नागरिकांचे ज्येष्ठ नागरिकांचे आणि 1 मे नंतर 18 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र ठाण्यात 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. शुक्रवारी तर लसीकरणाला थेट ब्रेकच लागला. ठाण्यातील लसीकरणाच्या सेंटरमधील लसींचा साठा संपला. त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न ठाणेकरांसमोर आणि पालिका प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे.
सिव्हिल रुग्णालयात गर्दी उसळली... साठा संपला
ठाण्यात पालिकेच्या सेंटरवर आणि सिव्हिल रुग्णालयात शुक्रवारी नियमित वेळेत लसीकरण सुरु झाले. लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र सिव्हिल रुग्णालयात नेहमीपेक्षा जास्त गर्दी आल्याने 1200 लोकांचे लसीकरण केले आणि लसींचा साठा संपला. साठा नसल्याने नागरिकांना तिष्ठत राहावे लागले. अशीच परिस्थिती पालिकेच्या लसीकरण सेंटरवरही होती.
गुरुवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद असल्याने शुक्रवारी मोठ्या प्रमाणात नागरिक सिव्हिल रुग्णालयात आले. जवळपास 1200 लोकांना लसीकरण केले आणि कोविशील्डचे डोस संपले. 1 एप्रिलपासून कोवॅक्सिन लस देताना सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले, कुठलीही सुट्टी घेतली नाही. सिव्हिल रुग्णालयात रोज 700 ते 800 लोकांना लसीकरण करण्यात आले. आज साठा पुन्हा येईल आणि पुन्हा लसीकरण सुरळीत सुरु होईल, असं जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी सांगितलं.