पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास उद्याचा दिवस उजाडणार
धेरी स्टेशनजवळ पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे.
मुंबई : अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ठप्प झालेली रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे. कारण रात्रीपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची कोणतीही शक्यता नाही, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अंधेरीहून वडाळ्याला हार्बर रेल्वेची पहिली लोकल सात तासांनंतर धावली आहे. मात्र पश्चिम रेल्वेचे जलद मार्गावरील वाहतूक रात्री 7 वाजेपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे. मात्र धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागणार असल्याचंही पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं केलं. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी उद्याची दिवस उजाडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जोरदार पावसामुळे अंधेरीतील गोखले ब्रिजच्या फुटपाथचा काही भाग आज सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. फुटपाथचा भाग थेट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अंधेरीपासूनची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज आहे. त्या ब्रिजवरील फुटपाथचा काही भाग कोसळला.
गोखले पूल 1960-70 चा असल्याने खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता, मात्र आज सकाळी तोही कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.
संबधित बातम्या
अंधेरी पूल दुर्घटना : मोटरमनचा इमर्जन्सी ब्रेक, अनेक प्रवाशांचे प्राण वाचले
अंधेरी पूल दुर्घटना : रेल्वे आणि रस्ते प्रवासासाठी पर्यायी मार्ग