CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची पाचही बोटं तुपात; राज्य सरकार आणखी एक गिफ्ट देणार, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीला सुरुवात
Mukhyamantri mazi ladki bahin yojana: मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ मंत्र्यांशी सल्लामसलत करुन या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आजघडीला 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत.
मुंबई: महायुती सरकारच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Lakdi Bahin Yojna) घोषणा करण्यात आली होती. या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे महिलावर्ग आनंदात असताना आता राज्य सरकारने त्यांना आणखी एक भेट द्यायचे ठरवले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची (mukhyamantri annapurna yojana) व्याप्ती वाढवून लाडक्या बहिणींना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. लवकरच यासंदर्भात शासकीय आदेश काढला जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तयारीही सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली जात आहे. या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील. राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल, असे अजितदादांनी सांगितले होते.
लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार?
अजित पवारांच्या अर्थसंकल्पाताली अन्नपूर्णा योजनेच्या घोषणेनंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. त्यामध्ये लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याविषयी भाष्य करण्यात आले होते. उज्ज्वला योजनेतील महिलांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे 300 रुपये अनुदान देते, एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत 830 रुपये धरुन प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर 530 रुपये याप्रमाणे तीन सिलेंडर मोफत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला फायदा होऊ शकतो. मात्र, त्यामुळे सरकारी तिजोरीवर आणखी भार पडू शकतो. त्यामुळे नियोजन आणि वित्त विभागाने लाडक्या बहिणींना अतिरिक्त लाभ देण्यास विरोधी केला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेसाठी आग्रही असल्याचे समजते.
राज्य सरकार योजना कशी राबवणार, पैसे कोणाला मिळणार?
लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल. गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळेल. या अटींमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारणत: अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ प्रत्यक्षात दीड कोटी कुटुंबांनाच मिळेल, असा अंदाज आहे. या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर अतिरिक्त चार ते साडेचार हजार कोटींचा बोजा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आणखी वाचा
'लाडकी बहीण योजने'साठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल; विवाहित महिलांना दिलासा, यादीबाबत महत्वाची अपडेट