खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास आता कारवाई होणार : मुंबई महापालिका
वारंवार सूचना देऊनही खासगी नर्सिंग होम आणि रुग्णालये सुरू न करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेने दिले आहे.
मुंबई : 'कोरोना कोविड 19' या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेद्वारे यापूर्वी वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, असे असूनही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल व खासगी रुग्णालये बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे.
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जी खासगी 'नर्सिंग होम' (शुश्रुषा गृह, पॉलिक्लिनिक इत्यादी), खासगी रुग्णालये वा खासगी रुग्णालये अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांच्यावर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर जी खासगी रुग्णालये, नर्सिंग होम सुरू होतील, त्यांना महापालिकेद्वारे 'पीपीई किट' देण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
खासगी रुग्णालय बंद असल्याने नागरिकांची गैरसोय गेल्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रातील जे खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, खासगी दवाखाने बंद आढळून आले. त्यांना प्रथम सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर याबाबत वारंवार सूचना व नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. नोटीस देण्याच्या कार्यवाहीनंतर महापालिका क्षेत्रातील काही खासगी नर्सिंग होम, खासगी रुग्णालये व काही खासगी रुग्णालये सुरू झाली. यानुसार सुरू झालेल्या खासगी रुग्णालयांना महापालिकेद्वारे 'पीपीई किट' देखील उपलब्ध करून देण्यात आल्या. तथापि, वारंवार सूचना व नोटीस देऊन देखील काही खासगी रुग्णालये अद्यापही बंद असल्याचे आढळून येत आहे. ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
बीकेसी मैदानावर सेकंड फेज मधील कोविड रुग्णालयाचे काम सुरू; आयसीयू सुविधा देखील उपलब्ध होणार
तर, कारवाई करणार नागरिकांची गरज आणि परिस्थिती लक्षात न घेता बंद ठेवण्यात येत असलेल्या या खासगी रुग्णालयांवर, खासगी हॉस्पिटलवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आज महापालिका आयुक्तांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रातील बंद असलेली खासगी रुग्णालये, खासगी नर्सिंग होम व खाजगी क्लिनिक यांची यादी करावी व त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
खासगी रुग्णालयांना पीपीई किट देणार त्याचबरोबर महापालिकेच्या सूचनेनुसार जी खासगी रुग्णालये, खासगी नर्सिंग होम व खाजगी क्लिनिक सुरू झाली आहेत किंवा सुरू होतील, त्यांना यापूर्वीच निश्चित केल्यानुसार आवश्यक त्या प्रमाणात 'पीपीई किट' उपलब्ध करून देण्यात येतील. या आपल्या भूमिकेचा महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान पुनरुच्चार केला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीदरम्यान महापालिका आयुक्तांनी सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना हे निर्देश दिले आहेत. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Corona patient in Thane | ठाण्यात कोरोना बाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू | ABP Majha