(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abhijit Katke : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पैलवान अभिजीत कटकेने पटकावला हिंदकेसरी खिताब
Abhijit Katke : पैलवान अभिजीत कटके याने हिंदकेसरी (kesari) खिताब पटकावलाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय.
मुंबई : महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पैलवान अभिजीत कटके (Abhijit Katke ) याने हिंदकेसरी (kesari) खिताब पटकावलाय. हैदराबाद येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटकेने खुल्या गटातून हा मान मिळालाय. अंतिम फेरीत अभिजीने हरियाणाच्या सोमवीरचा 5-0 असा पराभव केलाय. भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या वतीनं हिंदकेसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिजीने पटकावलेला हिंदकेसरीचा किताब म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि तितकीच अभिमानाची बाब आहे.
अभिजीत कटके याच्या विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जातोय. अभिजीत मुळचा पुण्याचा असल्याने पुण्यात देखील फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातोय. भारतीय कुस्तीतील सर्वात मानाची स्पर्धा म्हणजे हिंद केसरी. या हिंद केसरी सामन्याचा अंतिम सामना आज खेळला गेला.
प्रतिस्पर्धी पैलवानाला एकही गुण मिळू दिला नाही
पहिल्या फेरीत चार गुणांची आघाडी घेतलेल्या अभिजीतने सोमवीरला आक्रमणाची संधीच मिळून दिली नाही. दुसऱ्या फेरीत देखील नकारात्मक कुस्ती करीत असल्याने पंचांनी सूचना देऊन तीस सेकंदात गुण घेण्याची सूचना दिली. मात्र तीस सेकंदात तो अभिजीतचा भक्कम बचाव भेदण्यात अयशस्वी ठरल्याने पंचांनी अभिजीतला एक गुण दिला. शेवटच्या मिनिटांत सोमवीर आक्रमक झाला. परंतु, अभिजित त्याला एकही गुण मिळू न देता हिंदकेसरीची गदा पटकावली.
दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी
अभिजीत याने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari) किताब पटकावला आहे. त्यानंतर त्याने हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय.
अभिजीत मुळचा पुण्याचा
अभिजीत पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. या विजयाने अभिजीत याने महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले आणि अमोल बुचडे यांच्या पंक्तीत विराजमान होण्याचा बहुमान अभिजीतने पटकावला आहे.
विजयानंतर काय म्हणाला अभिजीत?
2017 सालच्या कुस्ती स्पर्धेत मला हार पत्करावी लागली होती. त्यानंतर सलग चार वर्षे मेहनत करून मी हा किताब पटकावला आहे. माझ्या प्रशिक्षकांनी सांगितली तशी मी कुस्ती केली, या विजयाने मला खूप आनंद झालाय. हैदराबादहून उद्या पुण्यात पोहोचल्यानंतर तेथे या विजयाचा आनंद साजरा केला जाणार आहे, अशा भावना अभिजीत याने एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या