Maharashtra MLC Election Results 2020 : शिवसेनेचा अमरावतीत पराभव का झाला? पराभवानंतर सेनेत धुसपूस
प्रचाराला फक्त शिवसेनेचे दोनच नेते दिसले एक कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि माजी कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत या दोघांव्यतिरिक्त शिवसेनेचे बाकी चेहरे दिसले नाही. त्या तुलनेत अपक्ष उमेदवार सरनाईक यांना सेनेला चांगलाच घाम फोडला.
मुंबई : पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनदेखील सेनेला जागा जिंकता आली नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवारांची कामगिरी सरस ठरली आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईकांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड करत दणदणीत विजय मिळवला. अॅड. किरण सरनाईकांनी 15 हजार 606 मतं घेत शिवसेनेच्या प्रा. श्रीकांत देशपांडे यांना पराभूत केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना अपक्ष उमेदवार जिंकल्याने शिवसेना नेमकी कुठे चुकली यावर पक्षात धूसपूस सुरु आहे.
देशपांडेंना स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध?
अमरावतीमध्ये शिवसेनेची तशीही फारशी ताकद नाही. शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवार निवडीवेळी श्रीकांत देशपांडेना स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता, पण उद्धव ठाकरेंच्या जवळच्या काही नेत्यांनी श्रीकांत देशपांडेंच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे स्थानिकांच्या मनाविरोधात उमेदवार देणं पक्षाला भारी पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू महाविकास आघाडीचे दोन मंत्री अमरावती जिल्ह्यात आहेत, त्यात मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यानं श्राीकांत देशपांडे यांचा विजय सहज पक्का असल्याची भावना कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची झाली. त्यामुळे बिनधास्त असलेल्या सेनेने देशपांडेंसाठी फार मेहनत घेतली नाही.
प्रचारात शिवसेना कमी पडली?
अमरावतीमघ्ये शिवसेनेचं फार काही नसताना मोठ्या ताकदीनं शिवसेना उतरली पाहिजे होती पण प्रचाराला फक्त शिवसेनेचे दोनच नेते दिसले एक कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि माजी कॅबिनेट मंत्री अरविंद सावंत या दोघांव्यतिरिक्त शिवसेनेचे बाकी चेहरे दिसले नाही. त्या तुलनेत अपक्ष उमेदवार सरनाईक यांना सेनेला चांगलाच घाम फोडला. सर्वच तुलनेत सरनाईक हे शिवसेनेवर भारी पडले. प्रचाराची रणधुमाळी जास्त गाजली नाही. तसेच काही महत्त्वाच्या नेत्यांवर या निवडणुकीची जबाबदारी दिली गेली पाहिजे होती, ती दिली न गेल्यानं पराभव झाल्याची चर्चा सुरु आहे.
शिवसेनेला धोबीपछाड करणारे सरनाईक कोण?
किरण सरनाईक कुटुंब हे गेली अनेक वर्ष काँग्रेसशी जोडलं गेलं आहे. अॅड. किरण सरनाईक अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वाशिममधील शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असून ते स्वत: शिक्षक आहेत. माजी मंत्री गोविंदराव सरनाईक हे गेली अनेक वर्ष राजकारणासह शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहेत.