अजित पवारांचा खोटारडेपणा उघड, पंढरपुरातील मतदारांनी खोटारड्यांना जागा दाखवावी प्रकाश आंबेडकरांची टीका
प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, अजित पवार यांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. सभागृहात स्थगिती देतात आणि पुन्हा वीज तोडणी होते.
सोलापूर : वीजबिलाबाबत अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. विधानसभेत त्यांना घेराव होऊ नये म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज तोडणार नाही असे आश्वासन दिले. मात्र शेवटी पुन्हा वीज तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी., असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते आज सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावी प्रकाश आंबेडकर यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर देखील टीका केली.
नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीज बील माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र राऊत यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाही. ते काँग्रेसचे दुबळे मंत्री त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाही. या सर्वामध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दरम्यान वीज तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केले. "कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, किती गुन्हे दाखल होतेत होऊ द्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत ?" असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीज बील तोडणीला विरोध दर्शवला.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली - प्रकाश आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरीमा घालवली अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान केवळ 1 किंवा 2 वेळा जातात. मात्र बंगालच्या निवडणुकींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 17 वेळा जाऊन आले आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभणारे नाही. गल्लीतला कार्यकर्ता देखील आजकाल पंतप्रधानावर आता टीका करु लागला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे. भारतीय जनता पार्टीने याचा विचार केला पाहिजे." अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच चीनने सीमेवरुन आपले सैन्य अद्याप मागे घेतलेले नसताना त्यांना गुंतवणुकीसाठी कशी काय परवानगी देण्यात आली याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असा सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर
आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. "पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या पंढरपुरात बैठक होणार आहे. ही निवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत." अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली.