AAP Nagpur : खड्ड्यांवर लावले झोनच्या इंजिनियरचे फोटो अन् झटक्यात निघाला तोडगा; 'आप'च्या 'गांधीगिरी'नंतर मनपाला जाग
खड्ड्यांवर संबंधित झोनच्या इंजिनियरचे फोटो लावून आप कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले. मात्र आंदोलनानंतर अवघ्या काही तासातच मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्यात आले.
Nagpur News : नागरिकांच्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष करणारे आणि वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आम आदमी पार्टी (AAP Nagpur) नागपूरतर्फे अनोखे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत कुंभारपुरा पाचपावली परिसरातील जीवघेण्या खड्ड्यांवर संबंधित झोनच्या इंजिनियरचे फोटो लावून आप कार्यकर्त्यांनी विरोध प्रदर्शन केले. मात्र आंदोलनानंतर अवघ्या काही तासातच मनपाच्या वतीने खड्डे बुजविण्यात आले. या संदर्भात आपने 3 ऑक्टोबर 2022 रोजी लिखित निवेदन देऊनही याची दखल घेण्यात आली नव्हती हे विशेष. या उपक्रमाचे फोटो सोशल मीडियासह मनपा वर्तुळातही वेगाने व्हायरल झाले होते, आता पुढच्या फोटोचा नंबर कोणाचा अशी चर्चा मनपा वर्तुळात रंगू रंगली.
एकीकडे नागरिकांनी कोणतेही नियम मोडल्यास प्रशासनाकडून लगेच दंड वसूल करण्यात येते. मात्र नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याकडेही मनपातर्फे वेळकाढूपणा करण्यात येत असल्याचा आरोप 'आप' कार्यकर्त्यांनी केला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार विकास कुंभारे (MLA Vikas Kumbhare) यांच्या घरापासून फक्त 200 मीटर अंतरावर असलेल्या या खड्ड्यावर लोखंडी सळ्या बाहेर निघालेल्या दिसून पडत होत्या. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही यावेळी आंदोलकांनी सांगितले.
लिखित तक्रार देऊनही दुर्लक्ष
या संदर्भात आपतर्फे लिखित स्वरुपात 3 ऑक्टोबर 2022 रोजी निवेदन देण्यात आले होते. यावर झोनचे इंजिनीअर कमलाकर राजूरकर यांनी तत्काळ समस्या सोडविण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या खड्ड्याच्या समस्येवर मागिल 15-20 दिवसांपासून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी 'गांधीगिरी' द्वारे प्रशासनाला जागे करण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.
मोठ्या नेत्यांच्या दौऱ्याच्यावेळी प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता नसते, मात्र सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच निधी नसल्याचे कारण सांगण्यात येतात. यापुढे प्रशासनाची मनमानी चालू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
चूक कोणाची?
परिसरात वर्षभरापूर्वीच नवीन सिवेज लाइन तयार करण्यात आली होती. मात्र स्थानिक कंत्राटदाराकडून कामात हलगर्जीपणा करण्यात आला, आणि त्यामुळेच हा जीवघेणा खड्डा तयार झाला असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असल्याचे आपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
फोटो व्हायरल होताच मनपा 'अॅक्शन मोड'वर
आंदोलनानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे छायाचित्र संबंधित झोन इंजिनियर कमलाकर राजूरकर यांच्या फोनवरही पाठविले. तसेच कामाच्या प्रगतीसंदर्भातही यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. मात्र यावर त्यांच्याकडे उत्तर नसल्याचे यावेळी 'आप'तर्फे सांगण्यात आले. मात्र 3 ऑक्टोबरपासून कुठलीही कारवाई या निवेदनावर करण्यात आली नव्हती. मात्र आपच्या आंदोलनानंतर लगेच मनपातर्फे रात्री या चेंबरच्या झाकणाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे आपल्या समस्या सोडविण्यासाठी अशा प्रकारे आंदोलन करावे का असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.
इतर महत्त्वाची बातमी
Court on Stray Dogs : आता मोकाट कुत्र्यांवरील प्रेम येणार अंगलट; कारवाईत अडथळा आणल्यास अटक!