(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Temple Reopen | राज्यातील मंदिरांसह धार्मिकस्थळे खुली, भाविकांमध्ये आनंद
राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं आजपासून खुली झाली आहेत. यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरं पुन्हा खुली करण्यात येतील अशी घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिवाळी भेट दिली होती.
मुंबई : तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं आजपासून खुली झाली आहेत. यामुळे राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बहुतांश मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला, भाविकांना दिवाळाचं भेट दिली. राज्यातील सर्व मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरु करण्यास परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. कोरोनाव्हायरस आणि त्यानंतर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील मंदिरं मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती.
सिद्धिविनायक मंदिर चार वाजल्यापासून खुलं सकाळपासून सिद्धिविनायक मंदिर चार वाजल्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं. क्यूआर कोडच्या असलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाचे नियम पालन करुनच भाविकांना प्रवेश दिला जात आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं गरजेचं असल्याचं सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.
शिर्डीचं साई मंदिर पुन्हा खुलं शिर्डीचं साई मंदिर आजपासून पुन्हा उघडण्यात आलं आहे. काकड आरतीनंतर साई दर्शनाला सुरुवात झाली. आठ महिन्यांनंतर मंदिंर खुलं झालं आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांची दर्शनाला गर्दी होत असून पहिलाच दिवस असल्याने आलेल्या भक्तांना आयडी कार्ड पाहून दर्शनाला सोडत आहे. प्रवेश क्रमांक दोनवर मोठी रांग बाहेर लागली आहे.
बीडमधील प्रभू वैद्यनाथाचं मंदिर उघडलं कोरोनामुळे मागच्या आठ महिन्यापासून बंद असलेले मंदिरे आज पाडव्याच्या मुहूर्तावर उघडले. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बीडमधील परळीचे प्रभू वैद्यनाथाचे मंदिर सकाळी पाच वाजताच उघडले. नेहमीप्रमाणे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी गर्दी करायचे. आज पुन्हा आठ महिन्यानंतर पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी भाविक पहाटेच पोहोचले होते. शासनाने घालून दिलेल्या नियम अटी पाळून या वेळी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. आज थेट गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश देण्यात आला नाही मात्र मुखदर्शन खुले करण्यात आले आहे.
भाविकांच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट आज दिवाळी पाडव्यानिमित्त आज मंदिर विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज झाले आहे. आठ महिन्यांनी विठुराया आणि भाविकांची भेट झाली आहे. पहिल्या भाविकाने सकाळी सहा वाजता दर्शन घेतलं. तापमान तपासून भाविकांना आत सोडलं जात आहे. तर तीन वेळा सॅनिटाईज केलं जात आहे.
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आलं. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घेतलं जात आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात 9 वाजल्यापासून भाविकांना प्रवेश करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरआजपासून सुरु होणार आहे. भाविकांना सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. मास्क सक्तीचा असणार आहे. देवस्थान समितीने ही नियमावली तयार केली आहे. याशिवाय आठवडाभरात अंबाबाईचे दर्शन देखील ऑनलाईन बुकिंगद्वारे करण्यात येणार आहे.
लातूरच्या बडी मर्कज मशिदीत सामूहिक नमाज लातूरमधील बडी मर्कज मशिद येथे आज सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सरकारने तयार केलेल्या नियमाचे यावेळी काटेकोरपणे पालन करण्यात आले. कोरोनामुळे 17 मार्चपासून मशिद बंद होती, अखेर आज मशिदी सामूहिक नमाज अदा केली.
ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात मनसे नेत्यांकडून काकड आरती आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्याचा मुहूर्त साधून मनसेने सकाळी पाच वाजता अनेक मंदिरात काकड आरती केली. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात देखील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मनसे नेते अभिजीत पानसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काकड आरती केली. यावेळी अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव यांनी मंजूर केल्याबद्दल सरकारचे आभार मानले. राज्यभरातील भाविकांनी राज ठाकरे यांच्याकडे उघडण्यासाठी साकडे घातले होते. सरकारने उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेतला असेही ते म्हणाले.
आठ महिन्यानंतर हर हर महादेवचा गजर, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर खुलं देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले तीर्थक्षेत्र नागेश दारुकावने औंढा नागनाथ मंदिर आज आठ महिन्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता नागनाथ प्रभूची महापूजा पार पडल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी देखील सकाळी लवकरच नागनाथ प्रभूचे दर्शन घेतले. तब्बल आठ महिन्यानंतर मंदिरात हर हर महादेवचा गजर घुमला आहे. मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी देखील रेखाटला होता.
धुळ्यातील नृसिंह मंदिरात अन्नकुटचं आयोजन, भाविकांची गर्दी इंद्र देवाचे गर्व हरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर धरला अशी अख्यायिका आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजन निम्मित अन्नकुट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. धुळे शहरातील प्राचीन नृसिंह मंदिरात यानिम्मित विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शासनाने पाडव्यापासून मंदिर खुली करण्याची परवानगी दिल्यानं एक दिवस आगोदरच हे मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचं पालन करण्यात येत असल्याचा दावा मंदिराच्या पुजाऱ्यांनी केला. दर्शनासाठी तसेच अन्नकुटचा लाभ घेण्यासाठी मंदिराबाहेर भाविकांची रांग लागली होती. चातुर्मास निमित्त व्यर्ज केलेल्या फक्त शाकाहारी भाज्या, पदार्थांचा या दिवशी नैवेद्य दाखवला जातो, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या
- Temple Reopen : महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव : राम कदम
- Temples Reopen: पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
- Temple Reopen : सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण; मंदिरं खुली करण्याच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- शिर्डी साई दरबारी सोमवारपासून ऑनलाईन दर्शन मिळणार, भाविकांना गर्दी न करण्याचं साई संस्थानचं आवाहन