(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विठ्ठल मंदिरातील भुयारी खोली नेमकी कशी? ABP माझाचा थेट भुयारी खोलीतून स्पेशल रिपोर्ट
विठ्ठल मंदिरात (Vitthal Mandir) सापडलेली भुयारी खोली नेमकी कशी असेल? याची सर्वांना उत्सुकता होती. या खोलीत एबीपी माझा पोहोचला आहे. या भुयारी खोलीतून माझाने खास रिपोर्ट केला आहे.
Vitthal Mandir Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Mandir) संवर्धनाचे काम सुरु असताना एक गुप्त भुयारी खोली सापडली होती. या खोलीत काही पुरातन मुर्ती सापडल्या (Ancient idols found) आहेत. आता ही खोली बंद केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके (Rajendra Shelke) यांनी माझाशी बोलताना दिली आहे. दोन दिवसापूर्वी मंदिरातील हनुमान गेट जवळ काम सुरु असताना कामगारांना ही भुयारी खोली आढळून आली होती. त्यानंतर काल सायंकाळी यातून 3 मोठ्या आणि 3 लहान भग्न मूर्ती बाहेर काढण्यात आल्या होत्या. या मूर्ती साधारण 15 ते 16 व्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, ही भुयारी खोली नेमकी कशी असेल? याची सर्वांना उत्सुकता होती. या खोलीत एबीपी माझा पोहोचला आहे. या भुयारी खोलीतून माझाने खास रिपोर्ट केला आहे.
नेमकी कशी आहे खोली?
विठ्ठल मंदिरातील या भुयारी खोलीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. आज ABP माझा या भुयारात पोहोचला. विठ्ठल मंदिराखाली बनवलेली ही गुप्त खोली खरेच वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. अतिशय अरुंद भागातील हे दगड काढून चार फूट पहिल्यांदा खाली उतरावे लागते. यानंतर साधारण चार फूट उंचीचा आणि 3 फूट लांबीचा एक छोटा रास्ता आहे. यातून पुढे गेल्यावर खाली दोन फूट उतरल्यावर ही भुयारी खोली दिसते. या खोलीची लांबी 5 ते 6 फूट असून रुंदी 4 फूट आहे. या खोलीला कशीबशी साडेपाच फूट उंची ठेवण्यात आली असून आत या खोलीमध्ये दिवे ठेवायला देवालय देखील बनवण्यात आल्या आहेत. या छोटेखानी गुप्त खोलीत खाली काळ्या मातीमध्ये या पुरातन मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या अरुंद खोलीत कसेतरी दोन माणसे थांबू शकत असली तरी येथे फारतर 5 ते 10 मिनिटे थांबणे शक्य होऊ शकते. अशा अरुंद जागेतून पुरातत्व विभाग व मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी या पुरातन मूर्ती बाहेर काढण्याचे मोठे काम केले आहे.
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर काय म्हणाले?
आज मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे देखील या भुयारी खोलीत उतरले होते. यानंतर त्यांनी या पुरातन मूर्तींची पाहणी केली. पूर्वीच्या काळी सुरक्षेच्या दृष्टीने अशा पद्धतीने मूर्ती ठेवल्या जात असतील, असा अंदाज त्यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला. विठ्ठल मंदिरात पूर्वीच्या काळापासून अनेक गुप्त भुयार असल्याच्या चर्चा गेल्या 100 वर्षांपासून पंढरपुरात चर्चिल्या जात असतात. अगदी या सोळखांबीच्या खाली अशीच एक भुयारी सोळखांबी असल्याचे जुनी मंडळी सांगतात. याबाबत औसेकर यांना विचारल्यावर अशा चर्चा होत असल्या तरी आम्हाला हे पहिलेच भुयार सापडल्याचे त्यांनी सांगितले. यामधील एक विष्णूची चतुर्भुज मूर्ती आहे. एक बालाजी अर्थात व्यंकटेशाची मूर्ती आहे. एक महिषासुर मर्दिनीची मूर्ती असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
उद्यापासून देवाचे पायावरील दर्शन सुरु
आता उद्यापासून देवाचे पायावरील दर्शन सुरु होत असताना पुरातत्व विभाग हा भुयारी मार्ग बंद करणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. पुरातत्व विभागाच्या मूर्ती तज्ञांच्याकडून या मूर्तींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या मूर्तींची वैशिष्ठे आणि मूर्तींची शैली तपासून या मूर्तींचे नेमका काळ शोधला जाणार असल्याचे शेळके यांनी सांगितले. दरम्यान, मंदिरात इतरठिकाणी काही भुयार असतील यावर बोलणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले
या मूर्ती भग्न पावलेल्या, अशा मुर्तींचा पूजेसाठी वापर होत नाही
विठ्ठल मंदिराचे अभ्यासक अॅड. आशुतोष बडवे यांनी या मूर्ती 16 व्या शतकातील असून सर्व भग्न अवस्थेत असल्याचे सांगितले. पूर्वीच्या काळी बडवे समाजाने भग्न पावलेल्या मूर्ती विसर्जन न करता अशा भुयारी खोलीत ठेवल्या असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विष्णूची पुरातन मूर्ती ओळखताना ज्या काही खुणा पाहाव्या लागतात त्या सर्व यातील विष्णूच्या मूर्तीवर असून त्याच्या चारही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असल्याचे त्यांनी सांगितले. या विष्णूच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला भूदेवी आणि श्रीदेवीच्या मूर्ती असल्याने ही पुरातन विष्णूच असल्याचे बडवे यांनी सांगितले. यातील दुसरी मूर्ती ही बालाजी अर्थात व्यंकटेशाची असल्याचे त्यांनी सांगितले. तिसरी मूर्ती अष्ट भुजा असणाऱ्या महिषासुर मर्दिनीचीच असली तरी या सर्व मूर्ती यवन आक्रमण काळात किंवा इतर कारणाने झिजलेल्या आणि भग्न पावलेल्या असल्याने याचा पूजेसाठी वापर होत नसल्याची माहिती अॅड. आशुतोष बडवे यांनी दिली. त्यामुळेच त्या नदीत अथवा समुद्रात विसर्जन करण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व राहावे म्हणून त्या या खोलीत ठेवल्या असाव्यात असेही बडवे यांनी सांगितले. याशिवाय सापडलेली संगमरवरी देवीची मूर्ती ही भग्न पावलेलीआहे. पादुका देखील खंडित झालेल्या आहेत. गाईचे भग्न झालेल्या मूर्तीचे अवशेषही आहेत. याबाबत मूर्तिशास्त्रज्ञ अभ्यास करुन बोलू शकतील असे त्यांनी सांगितले. मंदिरात इतर ठिकाणी भुयार असलेल्या आख्यायिका चर्चिल्या जातात. मात्र त्याही आख्यायिका समजूनच सोडून देणे चांगले असा सल्लाही आशुतोष बडवे यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या:
Pandharpur : विठ्ठल मंदिराच्या गुप्त खोलीचे गूढ उलगडले, 3 पुरातन मोठ्या मूर्ती आणि काही इतर लहान मूर्ती