एक्स्प्लोर
महिला पोलिसाची जिगरबाज कामगिरी, ओरिसाच्या 9 मुलींची सुटका
सोलापूर : महाराष्ट्र पोलीस दलातल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ओरिसातल्या तरुणींची मोठ्या संकटातून सुटका केली आहे. नोकरीच्या आमिषाने नऊ अल्पवयीन तरुणींना ओरिसाहून मुंबईला नेण्यात येत होतं. प्रत्यक्षात मात्र या मुलींना देहविक्री व्यवसायासाठी नेत असल्याचं उघड झालं.
सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा घारगे यांच्यामुळे 9 तरुणी आज सुरक्षित आहेत. एका महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे तरूणींचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता वाचलंय.
काय आहे प्रकरण?
मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस १२ जुलैला रात्री सोलापूर स्थानकावर दाखल झाली. कोणार्क एक्सप्रेसमधून अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या प्रवास करत असल्याची माहिती शर्मिष्ठा घारगे यांना सूत्रांकडून मिळाली. शर्मिष्ठा घारगे यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर आपल्या पथकासह जाळं लावलं होतं. कोणार्क एक्स्प्रेसच्या १० क्रमांकाच्या बोगीत या मुली आढळून आल्या. टोळीचे सूत्रधार मात्र पळाले.
15 मिनिटात स्टेशनवर
कोणार्क एक्सप्रेसमधून अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या प्रवास करत असल्याची माहिती घारगे यांना सूत्रांकडून मिळाली. खरं तर रेल्वेतल्या प्रवाशांची आणि रेल्वेत घडणाऱ्या घटनांशी तसा शहर पोलिसांचा संबंध नसतोच. आलेली माहिती रेल्वे पोलिसांना कळवून सोपस्कार पार पाडले तरी झालं असतं.
कोणार्क एक्स्प्रेस फक्त १५ मिनिटे सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबते. घटनेचं गांभीर्य आणि वेळेची मर्यादा ओळखून घारगे यांनी हद्दीचा विचार न करता थेट रेल्वेस्टेशन गाठलं. एका मोठ्या संकटातून या अल्पवयीन तरुणींची सुटका केली.
दलालांकडून मुलींची फसवणूक
या सगळ्या मुली ओरिसातील आहेत. गरिबी आणि निरक्षरता याचा फायदा घेऊन काही दलाल या मुलींना मुंबईला नेत होते. काही मुलींना शिक्षण, तर काहींना नोकरीचं आमिष दाखवून पालकांची मनधरणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र या मुलींना देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचा डाव असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पलायन केलेल्या सूत्रधाराचा रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.
या मुलींना मुंबईला घेऊन जाणाऱ्या आरोपीचं नाव संतोष नाईक असून, त्याने रेल्वे स्थानकावरून पलायन केलंय. रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या मुली ११ ते १७ वयोगटातील आहेत. गरिबीमुळे जगण्याशी संघर्ष करणाऱ्या या अल्पवयीन मुली दलालांच्या शिकार बनल्या असत्या. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे या मुलींच्या आयुष्यातल मोठं संकट टळलंय. शर्मिष्ठा घारगे यांची संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षता खरोखरच कौतुकास्पद आहे.
शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement