Sanjay Raut : 'मातोश्री'च्या वाटेला जाऊ नका, 20 फुट गाडले जाल... संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा
बोगस प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांनी आम्हाला नीतीमत्ता शिकवू नये असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नागपूर: शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा करु नका, 'मातोश्री'च्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे. राणा दाम्पत्याने मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान हे देशाचे आहेत, त्यांची सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे आहे असं सांगत खासदार संजय राऊत म्हणाले की, "काही घंटाधारी, बोगस हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याची भाषा वापरण्यात आली. जणू काय आपण महान योद्धे आहोत अशा प्रकारचा आव आणण्यात आला. अमरावतीचे बंटी आणि बबलीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांनी काही अॅम्बुलन्स तयार ठेवल्या होत्या. पण पंतप्रधानांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये असं सांगत पळ काढला."
खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात शिखंडीच्या आड राहून शिवसेनेवर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या मागे असलेल्यांना गाढल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. नव्याने महाभारत घडवण्याची ताकत ही शिवसेनेची आहे. बोगस सर्टिफिकेट असलेल्या खासदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी पुढची निवडणूक लढवावी. त्यावेळी पहावं अमरावती कुणाचं आहे. अमरावती शिवसेनेचंच आहे. मी आभार मानतो या लोकांचे की यांच्यामुळे शिवसेनेचे रक्त काय आहे याची प्रचिती आली आहे. जे पळून गेलेले आहेत, त्यांचे बहाणे काही असो, जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागले तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात."
महत्त्वाच्या बातम्या: