(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navneet - Ravi Rana : रवी राणांची मोठी घोषणा; अखेर आंदोलन मागे, हे कारण दिलं
Navneet Ravi Rana Latest News : पंतप्रधान मोदी (PM Modi Mumbai Tour) यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
Navneet - Ravi Rana Latest News : पंतप्रधान मोदी (PM Modi Mumbai Tour) यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून माझीही जबाबदारी आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे.
रवी राणा म्हणाले की, आमचा आग्रह हनुमान चालिसासाठी होता. मात्र मुख्यमंत्री ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही स्वताहून हे आंदोलन मागे घेत आहोत. बाळासाहेबांचे विचार थोडेसे जरी तुमच्यात असतील तर तुम्ही योग्य मार्गावर नक्की याल, असं राणा म्हणाले. भगवान राम आणि हनुमानाचा यांनी अवमान केला आहे. राम भक्त आणि हनुमान भक्त यांना धडा शिकवतील, असंही ते म्हणाले.
रवी राणा यावेळी म्हणाले की, आमच्या अमरावती आणि मुंबईतील घरावर हल्ला झाला. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था कुठं होती. पवारांच्या घरावर हल्ला होतो यावरुन राज्यात कायदा सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येतं. आमच्या घरावर हल्ला केल्यानंतर आता काय कारवाई करणार हे पाहणार आहे, असं राणा म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच गुन्हे दाखल व्हायला हवेत जे शरद पवार यांच्या घरावर आंदोलन केलेल्या लोकांवर दाखल केले आहेत, असं राणा म्हणाले. आमच्या घरात शिवसैनिक घुसले, पोलिसांनाही धक्काबुक्की केली. याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत, असंही राणा म्हणाले.
राणा म्हणाले की, महाराष्ट्राची वाटचाल पश्चिम बंगालच्या दिशेनं निघाली आहे. पंतप्रधान विकासाचा संकल्प घेऊन महाराष्ट्रात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना वाटतंय की कायदा सुव्यवस्था निर्माण व्हावी, पंतप्रधानांचा दौरा रद्द व्हावा. हनुमान चालिसाचा एवढा विरोध का आहे? या महाराष्ट्राची व्यवस्था बिघडवण्याचं काम हे लोकं करत आहेत. नागरिकांना त्रास होऊ नये आणि पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत.
देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये मोठ्या गतीनं राज्य पुढं आणलं. यापेक्षा 50 पटीनं राज्य मागे आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आम्ही कुणाच्याही दबावाला बळी पडलेलो नाही. आम्ही सामान्य लोकांमधून निवडून आलेलो आहोत. त्यामुळं कुणाला घाबरत नाहीत, असं राणा म्हणाले. बाळासाहेबांचे विचार थोडे जरी तुमच्यात असतील तर त्यांनी दाखवलेल्या दिशेनं तुम्हाला परत यावं लागेल अन्यथा गोव्यात जशी तुमची परिस्थिती झाली, तशी परिस्थिती महाराष्ट्रात होईल, असंही ते म्हणाले.
इतर संबंधित बातम्या
आय रिपीट, राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Navneet Rana vs Shivsena : राणांचा इशारा, शिवसैनिकांचा पहारा; आज मातोश्रीसमोर हाय व्होल्टेज ड्रामा
Ravi Rana : शिवसैनिकांकडून गुंडगिरी, आम्ही मातोश्रीवर जाणाराच, फेसबुक लाईव्ह करत रवी राणांची माहिती