Shiv Jayanti 2022 : शिवाजी पार्कवर शिवजयंतीचा उत्साह, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली शपथ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज शिवाजी पार्कमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
Shiv Jayanti 2022 In Mumbai Maharashtra : आज राज्यात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज शिवाजी पार्कमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी राज ठाकरे यांनी जमलेल्या सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली. या शपथेमधील मजकूर हा सद्य स्थितीच्या अनेक मुद्यांना स्पर्श करणारा होता.
19 फेब्रुवारी रोजी तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाल्यानंतर आता आज 21 मार्च रोजी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली जात आहे. दरम्यान राज्यभरातील शिवभक्तांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा झाला आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार साजरी केली जातेय. यानिमित्त आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर उपस्थिती दर्शवली. तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी मनसेनं जय्यत तयारी केली आहे. शिवसेना याआधी तिथीनुसार शिवजयंती साजरी करत होती पण आता हिच शिवजयंती गेल्या काही वर्षापासून मनसे दणक्यात साजरी करत आहे. शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यांवर मनसेच्या चित्रपट सेनेकडून हॅलिकॅाप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. मनसेकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय.
आज राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेल्या शपथेमध्ये सद्य स्थितीच्या विविध मुद्यांना स्पर्श केला आहे. स्वराज्याच्या उभारनीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याच प्रयत्न केला. त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून सर्वजण प्रयत्नांची पराकाष्टा करु. हे स्वराज्य स्थापन करताना जाती जातींमध्ये हरवलेला समाज पुन्हा एक होईल, राज्यात महिलांना सुरक्षीत वाटेल, युवकांच्या हाताला चांगला रोजगार मिळेल, प्रत्येक मुलं शाळेत जाईल, तसेच दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल असा मजकूर या शपथेमध्ये होता. तसेच येथील शहरं, गावं, पाडे, तांडे सुंदर, सुखद आणि स्वच्छ असतील. भ्रष्टाचार नष्ट होईल. शेतमालाला योग्य भाव मिळेल, कामगारांना न्याय मिळेल, यासाठी पडेल ते करु असा राज ठाकरे यांनी दिलेल्या शपथेमध्ये मजकूर आहे.