Sharad Pawar Resigns : जयंत पाटील बैठकीबाबत अनभिज्ञ, नाराजीच्या चर्चा; जयंत पाटील म्हणतात, "मला बोलावण्याची गरज वाटली नसेल"
Sharad Pawar Resigns : 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशसोहळ्यात शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत घोषणा केली आणि सभागृहात एकच गोंधळ झाला.
Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. अशातच शरद पवारांनी निर्णय कायम ठेवल्यास पक्षाचा नवा अध्यक्ष कोण? अशा चर्चाही राज्यात सुरू आहेत. अशातच एक महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आज मुंबईत व्हाय. बी. सेंटरला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. मात्र या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नाहीत. जयंत पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात आहेत. पक्षाची एवढी महत्त्वाची बैठक आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनुपस्थित असल्यामुळे जयंत पाटलांच्या नाराजीच्या चर्चांनी सूर आळवला आहे. तसेच, या बैठकीबाबत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही माहिती नसल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांच्या हवाल्यानं मिळाली.
मला बोलवण्याची गरज वाटली नसेल : जयंत पाटील
मुंबईतील व्हा. बी. सेंटरला राष्ट्रावादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीबाबत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना कोणतीही माहिती नसल्याची माहिती मिळत आहे. अशातच याबाबत बोलताना त्यांना मला बोलवण्याची गरज वाटली नसेल, म्हणून त्यांनी नसेल बोलावलं असं जयंत पाटील म्हणाले. तसेच, ना मी पक्षावर नाराज, ना पक्ष माझ्यावर नाराज, असंही जयंत पाटील म्हणाले.
'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशसोहळ्यात शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत घोषणा केली आणि सभागृहात एकच गोंधळ झाला. सभागृहात उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते पवारांना वारंवार निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते. त्यामध्येच एक महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही होते. पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर जयंत पाटील भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू तराळले. त्यांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती भरल्या डोळ्यांनी केली. तसेच, ज्यांना पक्ष चालवायचा आहे त्यांना चालवू द्या, असेही उद्गार जयंत पाटील यांनी काल काढले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
काय म्हणाले होते जयंत पवार?
"आज राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांच्याच नावानं ओळखला जातो. त्यामुळे त्यांनी अचनाक असा निर्णय घेण्याचा त्यांना अजिबात अधिकार नाही. मी सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की, त्यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना अजुनही इथून पुढं पाहिजे. तुम्ही आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या, तुम्ही पक्ष नव्या लोकांच्या हातात द्या. पण तुम्ही पक्षाच्या प्रमुख पदावरुन बाजूला जाणं हे कोणाच्याच हिताचं नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सर्व थांबतो."