Gram Panchayat Election : सरपंचपदाची माळ अपशकुनी? साताऱ्यातील राजपुरेत मृ्त्यूच्या भीतीनं सरपंचपदाला ना ना!
राजपुरे गावात जी व्यक्ती सरपंच होते त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या गावातील ग्रामस्थांमध्ये ठासून भरली आहे.
सातारा : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या मध्ये सरपंच कोण होणार यासाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अनेक गावांमध्ये सध्या बिनविरोध निवडणुका होऊन सरपंच पद निवडले गेले. मात्र सध्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे राजपुरे गावाची चर्चा काही औरच म्हणावी लागेल. या गावात सरपचं पद स्वीकारण्यास कोणीही तयार नाही.
एका बाजूला सरपंच पदासाठी लाखो रुपये खर्च करून घेऊन पद मिळवतात तर अनेक जण निवडणूक लढवताना लाखो रुपये खर्च करून हे पद मिळवण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला अशी परिस्थिती आहे तर दुसर्या बाजूला म्हणजेच सातारा जिल्ह्यातील पाचगणी तालुक्यातील राजापूर या गावात जवळपास गेले पाच टर्म कोणीही सरपंच होण्यासाठी तयार नाही. सर्व कारभार हा उपसरपंच संभाळत आहे. त्याचे कारण मात्र सर्वांना धक्का देणारे आहे. जो सरपंच होतो त्याचा सरपंच पदावर असतानाच मृत्यू होतो. ही दृढ अंधश्रद्धा या राजापुरे गावातील ग्रामस्थांमध्ये ठासून भरली आहे.
सत्वशिला राजपुरे वय 42 वर्ष, अशोक राजपुरे वय 50, किसन राजपुरे वय 52 ,रामचंद्र राजपुरे वय 55 यांचा सरपंच पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर मृत्यू झाला. सरपंच पदाची माळ गळ्यात पडली आणि यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही साखळी ग्रामस्थांनी एक वेगळ्या वाटेवर नेऊन ठेवली. सरपंच पद स्वीकारल्यानंतर मृत्यू होतो अशी चर्चा गावात सगळीकडे सुरू झाली. नुसती चर्चाचं नाही तर गावातल्या कुठलाही व्यक्ती मी सरपंच होणार नाही अशा भूमिकेतूनच गावाला गेली पाच टर्म सरपंच नाही.
एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी सरपंच पदच नको असं म्हणत सरपंच पदही रिक्त ठेवायला चालू केलं आहे. उपसरपंच या गावचा कारभार आज पर्यंत संभाळत आले आहे. आता जर का या विषयी बाहेर लोकांना सांगितलं तर लोक चेष्टा करतील या भीतीने ग्रामस्थांनी आजपर्यंत यावरती कधीच भाष्य केले नाही. युवकांनी मात्र यंदाच्या वर्षी सरपंच करायचं म्हणून प्रबोधन चालू केलं आहे.
नव्या पिढीतील युवकांच्या पुढाकाराने गावातली एक महिला सरपंच पदासाठी तयार झाली. त्यांनी यंदा गावाला तसे सांगितले आहे. खरं तर या महिलेचा कौतुक म्हणावं लागेल कारण चाळीस वर्षापासून कधीच या गावांमध्ये निवडणूक झाली नव्हती मात्र यंदा निवडणूक झाली. राजापूर हे गाव तसं पाचगणी पासून दुर्गम भागातील पहिल्या टोकावर असलेलं गाव आहे. राजपुरे गावापासून पुढे कोणत्याही गावाला रस्ता नाही. शेवटचं गाव दुर्गम असले तरी गावाचा म्हणावा असा विकास झाला नाही. गावच्या या अंधश्रद्धेचा विकासकामांना आजपर्यंत फटका बसला आहे.
पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रात आणि जिथे अंधश्रध्देच्या विचारांची धारणा घेत साता-यात अंधश्रध्दा निर्मुलनाच्या चळवळीची सुरवात झाली अशा सातारा जिल्ह्यातच अशा पद्धतीची ही अंधश्रद्धा असणं म्हणजे गंभीर बाब आहे.
जरी एका महिलेने हे सरपंच पद स्वीकारण्याचं धाडस दाखवल असलं तरी या गावातील प्रशासकीय यंत्रणेचा अभाव हा प्रखरतेने जाणवत आहे. आता जिल्हाधिका-यांनी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी गावात बैठक घेऊन गावाचं प्रभोधन करणे आवश्यक आहे.
संबंधित बातम्या :