Gram Panchayat Election : सत्तेसाठी कायपण! नांदेडमध्ये सासू विरुद्ध सून तर पित्याच्या विरोधात पुत्र मैदानात!
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. नांदेड जिल्ह्यातील दोन गावांमधील दोन लढतींकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. नांदेडमधील दाभडमध्ये सासू-सुनेमध्ये तर आंबेगावमध्ये पितापुत्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 नांदेड: राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. वेगवेगळ्या माध्यमांतून उमेदवार आपल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच या निवडणुकांमध्ये काही मजेदार लढती पाहायला मिळत आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन गावांमधील दोन लढतींकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. नांदेडमधील दाभडमध्ये सासू-सुनेमध्ये तर आंबेगावमध्ये पितापुत्र एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत.
दाभड ग्रामपंचायतमध्ये सासूबाई विरुद्ध सुनबाईमध्ये चुरशीची लढत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानसभा मतदारसंघातील दाभड ग्रामपंचायतमध्ये सासूबाई विरुद्ध सुनबाईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अर्धापूर तालुक्यातील व नांदेड महापालिका क्षेत्राच्या निकटवर्ती असणाऱ्या दाभड ग्रामपंचायतीतील सासू सुनांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. ग्रामपंचायतमध्ये तीन वार्ड असून त्यात तब्बल 19 अपक्ष उमेदवार ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे घरातील सत्ता घरातच राहावी यासाठी सासूबाई व सुनबाई ही ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात आमनेसामने आहेत. यात माजी सरपंच रेखा दादजवार व संगीता दादजवार ह्या सासू-सुना निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आंबेसांगवीमध्ये पितापुत्र आमने सामने जिल्ह्यातील आंबेसांगवी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पिता पुत्रच एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकले आहेत. OBC प्रवर्गाचा कोरम पूर्ण करण्यासाठी बाप लेकालाच एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले आहे. राजकारनात कुणी कुणाचा कायम स्वरूपी मित्र आणि कुणी कायमस्वरूपी शत्रू नसतो. फक्त सत्ता आपल्या बाजूला असावी आणि सत्ता काबीज कशी करता येईल यासाठी रस्सीखेच चालू असते. आंबेसांगवी गावात बालाजी व्यंकटराव पांचाळ व व्यंकटराव सखाराम पांचाळ या दोघा बाप लेकांनाच चक्क ग्रामपंचायतमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने उभे केले आहेत.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द
नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली गेल्या. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी झाली. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेतली गेली. त्याचदिवशी निवडणूक चिन्ह वाटप झाली आहे. आता मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.