बिनविरोध करायची असेल तर गावाच्या एकीने व्हावी प्रलोभनाने नको, वाखरी ग्रामस्थांच्या जळजळीत प्रतिक्रिया
बिनविरोध ग्रामपंचायत केल्यास झालेल्या बक्षिसांच्या घोषणा आचारसंहितेचा भंग आणि फसवणूक. बिनविरोध करायची असेल तर गावाच्या एकीने व्हावी प्रलोभनाने नको. बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीवर वाखरी ग्रामस्थांच्या जळजळीत प्रतिक्रिया.
पंढरपूर : यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबत राज्यातील विविध आमदारांकडून लाखोंची बक्षिसे जाहीर केली गेली आहेत. यावर बरीच उलटसुलट चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. काही गावे या प्रलोभनातून बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत तर काही गावातील वाद संपत नसल्याने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्वसामान्य ग्रामस्थांना यावर काय वाटते हे पाहण्यासाठी आम्ही पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यातून भल्याभल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे प्रश्न या मतदारांनी समोर आणले.
वाखरी हे पंढरपूरला चिटकून असलेले 8 हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथे निवडणूक जाहीर झाली असून गावात 17 सदस्यांची बॉडी आहे. निवडणूक बिनविरोध होणे हे खऱ्या अर्थाने चांगले ही भूमिका सर्वांचीच असली तरी राजकीय लोकांना नेहमीच विश्वासघाताची भीती वाटते. यामुळे बिनविरोध करून आम्ही पोळलो आणि गावाचे नुकसान झाल्याची भूमिका गावातील विविध पक्षांचे पुढारी मांडतात. यात ज्येष्ठ असलेले गंगाधर गायकवाड यांच्यामते निवडणूक झाल्यास किमान ईर्ष्येतून गावाची कामे होतात आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे शक्य होत असल्याचे त्यांचे अनुभवी मत व्यक्त करतात. गावातील तरुण नेते आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले नाना गोसावी यांनी मात्र बक्षिसे जाहीर करणाऱ्या आमदारांना थेट सवाल करीत 25-25 लाखांच्या घोषणा करताना एवढा निधी सरकार यांना देणार आहे का? असा सवाल करीत हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे मत व्यक्त केले आहे.
गावातील तरुणाईचा सुरु अधिक आक्रमक होता. जर आमचा कोणी राजकीय फायद्यासाठी बक्षिसे जाहीर करून वापर करणार असेल तर अशी बिनविरोध निवडणूक आम्हाला नकोय असे मत दत्ता जगताप याचे आहे. गावातील छाया आगलावे या महिला मतदाराने तर बिनविरोध निवडणूक गावाच्या फायद्यासाठी गरजेची असल्याचे सांगताना यासाठी बक्षिसाचे प्रलोभन कशाला असा सवाल करीत गावाच्या एकीतून बिनविरोध निवडणूक व्हावी असे मत व्यक्त केले. तर सुलभाताई पोरे यांनीही बिनविरोध निवडणूक झाल्यास गावातील विकास झपाट्याने होऊ शकेल असे मत व्यक्त केले. गावातील ज्येष्ठ असलेल्या सुमन आज्जी बचुटे यांनी मात्र निवडणूक व्हावी तरच गावातील विकास होतो अन्यथा असे रस्ते मिळतात असा टोमणाही लगावला.
संबंधित बातम्या :