Sanjay Raut Detained : नोटीस, चौकशी, ताब्यात; जाणून घ्या राऊतांवरील ईडी कारवाईचा दोन वर्षातील घटनाक्रम
Sanjay Raut Detained : आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारासच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. परंतु, याची सुरूवात 2020 लाच झाली होती.
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांना पत्रावाला चाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने (ED) ताब्यात घेतले आहे. संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ईडीकडून संजय राऊत यांना अटक होण्याची देखील शक्यता व्यक होत आहे. संजय राऊत यांनी देखील म्हटले आहे की, ईडी मला अटक करणार असून मी अटक करून घेणार आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारासच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले. परंतु, याची सुरूवात 2020 लाच झाली होती.
संजय राऊतांच्या पत्नींना ईडीची समन्स
27 डिसेंबर 2020 रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पहिले समन्स पाठविले. त्यानंतर 4 जानेवारी 2022 रोजी राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची ईडीकडून साडेतीन तास चौकशी करण्यात आली. 11 जानेवारी 2022 रोजी वर्षा राऊत यांना ईडीकडून दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले.
प्रवीण राऊत यांना उटक
2 फेब्रुवारी 2022 रोजी पत्रावालाचाळ प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली.
संजय राऊतांची संपत्ती जप्त
5 एप्रिल 2022 रोजी ईडीने संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता जप्त केली. 27 जून 2022 रोजी संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. 28 जून 2022 ला राऊतांनी वकिलांमार्फत 7 ऑगस्टपर्यंत ईडीकडे हजर राहण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी मुंबईतील कार्यालयात संजय राऊतांची दहा तास चौकशी झाली. नंतर 27 जुलै 2022 रोजी संजय राऊतांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. परंतु, राऊत चौकशीला गैरहजर राहिले.
संजय राऊतांची नऊ तास चौकशी
31 जुलै 2022 म्हणजे आज सकाळी सात वाजताच ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी दाखल झाली. त्यानंतर तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना चार वाजता ईडीने ताब्यात घेतले. सध्या राऊतांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या