ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त, चौकशी आहे सुरू
ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त
Sanjay Raut Detained After ED Raids: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असताना त्यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. सध्या संजय राऊत हे ईडी कार्यालयात उपस्थित आहे. त्यांची चौकशी देखील सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता ही मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11.50 लाख रुपयांच्या रोकडबद्दल ईडी संजय राऊत यांच्याकडून माहिती घेत आहे. त्यांच्या राहत्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. ईडी छापेमारीत त्यांच्या घरातून काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहेत. या रोख रक्कम बद्दल माहिती देताना राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांना सागितलं होत की, त्यांनी त्यांच्या बँकेत खात्यातून हे पैसे घर खर्चासाठी आणि इतर कामांसाठी काढले आहेत. मात्र ईडीला यांची शहानिशा आणि ही रक्कम टॅली करायची आहे. जर ही रोकड टॅली झाली तर, ही रक्कम पुन्हा राऊत यांना परत केली जाणार असल्याचं ईडीकडून सांगण्यात येत आहे. तसेच ही रक्कम टॅली झाली नाही तर या संदर्भात देखील त्यांची चौकशी केली जाईल.
मलिक यांच्या शेजारी राहण्याची राऊतांची तयारी: सोमय्या
राऊत यांच्या घरातून रोकड जप्त केल्याची माहिती समोर आल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''संजय राऊत यांनी नवाब मलिक यांचे शेजारी होण्याची मानसिक तयारी दिसत आहे. ज्या पद्धतीचे घोटाळे एक-एक करून बाहेर येत आहे. या सर्वांचं संकलन न्यायालयासमोर जाणार, तेव्हा मी निश्चितपणे सांगतो नवाब मलिक यांच्या शेजारी राऊतांची राहण्याची व्यवस्था केली जाणार.''
दरम्यान, संजय राऊत यांच्या दादर येथील घरात सकाळी 7 वाजता ईडीचे पथक दाखल झाले होते. यानंतर तब्बल 9 तास ईडी पथक त्यांच्या घराची तपासणी करत होते. तसेच राऊत यांची पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत होते. राऊत यांच्या घरी ईडी दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने ते राहत असलेल्या दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात शिवसैनिक जमायला सुरुवात झाली. यावेळी मुंबई पोलीस आणि सीआरपीएफचे जवान देखील तेथे तैनात करण्यात आले. यावेळी राऊत यांना वाहनात बसून ईडी कार्यलयात घेऊन जात असताना शिवसैनिक आक्रमक झाले. तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी आमदार सुनील राऊत हे घराबाहेर आले. त्यांनी कार्यकत्यांना शांत राहण्याचं आवाहन करत, राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना अटक झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान, अद्यापही राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही. ईडी कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.