New Year 2020 | देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर भाविकांनी फुललं
गर्दीमुळे साई भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी कळसाचं दर्शन घेतलं. समाधी समोरील बाहेरील भागात तसेच द्वाराकामाई परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
शिर्डी : नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी विविध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली आहे. देवदर्शन करून नवं वर्ष सुख आणि समाधानाचं जाण्यासाठी अनेक भक्तांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून भक्तांकडून देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यात आली आहे. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतिपुळे अशा राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी हजेरी लावली.
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्तांनी साई दरबारात हजेरी लावली. सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साई भक्तांनी साई नगरीत हजेरी लावत नववर्षाचे स्वागत केलं. रात्रभर मंदिर खुलं असल्यानं रात्री 12 वाजता साईंच दर्शन मिळावं या उद्देशाने भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याचं प्रकर्षाने जाणवलं. तर माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजन विचारे यांनीही मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास साईसमाधीच दर्शन घेतलं.
साईनगरीत नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. अनेक तास रांगेत उभं राहत भाविकांनी नविन वर्षात सुख-शांती आणि स्वास्थ्यासाठी साईबाबांना साकडं घातलं. साईबाबा संस्थाननंही नवीन वर्षाचं स्वागत करताना साईसमाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांनी सजवलं आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. साईनामाचा गजर करत साईभजनावर तल्लीन होत भक्तांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. संस्थानने आयोजित केलेल्या साई महोत्सवाचाही भाविकांनी आनंद घेतला.
गर्दीमुळे साई भक्तांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी कळसाचं दर्शन घेतलं. समाधी समोरील बाहेरील भागात तसेच द्वाराकामाई परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भाविकांनी मिठाई, चॉकलेट वाटून जल्लोष साजरा केला. तर साईनामाचा गजर करत भाविकांनी मध्यरात्री 12 वाजता भजनात तल्लीन होत मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. मध्यरात्री माजी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजन विचारे साईबाबांचे दर्शन घेतलं. विखे पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांनी साई समाधीवर कमळाचं फुल अर्पण केलं. यावेळी मोठा हास्यविनोद मंदिरात पाहायला मिळाला. जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा देत या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी मिळो आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळो, अशी प्रार्थना साईचरणी केल्याचं विखे पाटील म्हणाले.
नविन वर्षात साईबाबांचे आलं शीर्वाद घेण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सुद याने सहपरिवार साई दरबारी काल हजेरी लावली होती. साई समाधीवर शाल आणि पुष्पहार अर्पण करत सोनु सुदने साईंचे आशीर्वाद घेतले. साईबाबांच्या आशिर्वादाने सर्व काही मिळाआहे. त्यामुळे बाबांना धन्यवाद देण्यासाठी नवीन वर्षात आलो असल्याचं सोनू सूदने सांगताना देशातील शेतकरी सुखी-समाधानी राहावा आणि दुष्काळाचं सावट दूर व्हावं असं साकडं साईबाबांना घातल्याचं सोनू सुदने सांगितलं.
शिर्डीव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर मंदिरांमध्येही पर्यटकांची गर्दी होती. गणपतीपुळ्यात पर्यटकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो यासाठी पर्यटक गणपती चरणी लीन झाले आहेत. तसेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिचा गाराभाराही आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे. संपूर्ण मंदिर आकर्षक लव्हेंडर फुलांनी सजवलं आहे. देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांभी मंडप फुलांनी सजवला आहे. तसेच भक्तानी पांडुरंगाच्या चरणी लीन होत नवीन वर्ष सुखसमाधानाचं जावो ही प्रार्थना केली.
नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी कोल्हापुरातही अंबाबाई मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली होती. तसेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही रात्रीपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून नागरिक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेल होते.