(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Bajaj: उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Rahul Bajaj: राहुल बजाज यांचं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुंबई: बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणार व्यक्ती गमावल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली. तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली.
राहुल बजाज यांनी एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते असं मुखमंत्री म्हणाले.
राहुल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे
महत्त्वाच्या बातम्या:
- Rahul Bajaj Passes Away: 'हमारा बजाज' हरपला, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन
- Rahul Bajaj Passes Away : बजाज चेतक बनली होती प्रत्येक घराची शान, राहुल बजाज यांनी तयार केली होती खास स्कूटर
- Rahul Bajaj: भारताने उद्योगपती, दीपस्तंभ अन् 'हमारा बजाज' गमावला; राहुल बजाज यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया