मोदींच्या दौऱ्यानिमित्त सोलापुरात शिक्षकांना कामाला जुंपलं
शहरात ज्याठिकाणी जुन्या जाहिराती होत्या, पुसून टाकल्या जात आहेत. शहरातील दुरावस्था मोदी आणि सभेला येणाऱ्या मंडळींना दिसू नये, यासाठी महापालिकेचा हा सगळा खटाटोप आहे.

सोलापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 9 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदींच्या दोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी सोलापूर 'स्मार्ट' दिसावी यासाठी महापालिकेने धावपळ सुरु केली आहे. शहरातील भिंती रंगवण्याचं काम महापालिकेने हाती घेतलं आहेत. त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही कामाला लावलं आहे.
सोलापूर पार्क मैदानावर नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. मोदींना सोलापूर शहर चकाचक दिसावं यासाठी महापालिकेकडून चक्क शिक्षकांना कामाला लावण्यात आलं आहे. शहरात ज्याठिकाणी जुन्या जाहिराती होत्या, पुसून टाकल्या जात आहेत. शहरातील दुरावस्था मोदी आणि सभेला येणाऱ्या मंडळींना दिसू नये, यासाठी महापालिकेचा हा सगळा खटाटोप आहे.
शहरातील सार्वजनिक इमारतींच्या भिंतीवरील सगळ्या जाहिराती पुसण्याचं काम विद्यार्थी दोन दिवसांपासून करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळाही बुडत असल्याचं समोर येत आहे. महापालिकेच्या कॅम्प भागातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील ही मुलं आहेत. नरेंद्र मोदींच्या सभेला येणाऱ्या मंडळींना भिंती सुंदर दिसाव्या यासाठी पुसलेल्या जाहिरातींच्या जागेवर छान छान फुलं काढण्यात येत आहेत.























