मुख्यमंत्रीपदी फडणवीस पुन्हा नको, ट्विटरवर #RejectFadnavisForCM हॅशटॅग ट्रेण्ड
ट्विटरवर सध्या #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. हा हॅशटॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 12 दिवस उलटले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाही. निवडणुकीपूर्वी अनेक प्रचारसभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'चा नारा दिला होता. परंतु महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मंत्रीपदांचं वाटप करण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या शक्यता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. तसेच कालपासून ट्विटरवरुनदेखील अशाच प्रकारची मागणी होत आहे.
ट्विटरवर सध्या #RejectFadnavisForCM आणि #RejectFadnavisAsCM हे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. हा हॅशटॅग वापरुन नेटिझन्स देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवू नका अशी मागणी महायुतीकडे करत आहेत. तर अनेकजण असं सुचवत आहेत की शिवसेनेने भाजपसोबत युती तोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला हवं. जेणेकरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदापासून आणि भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर राहील.
ट्विटरकर देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या पाच वर्षांमधील कामगिरीवर नाखूश आहेत. गेल्या पाच वर्षांत देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत, फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्यातला शेतकरी संपावर गेला. सांगली, सातारा कोल्हापुरातील सर्व पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. अशा अनेक गोष्टींना फडणवीस जबाबदार आहेत, असा ट्विटरकरांचा सूर आहे. त्यामुळेच ट्विटरकरांना फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी नकोत.
ट्रेण्ड करणारे ट्वीट्स पाहिल्यानंतर महत्त्वाची बाब समोर आली आहे की, ट्विटरकरांना फडणवीस यांच्याऐवजी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यापैकी कोणताही नेता चालेल. तर काहींनी भाजचाच मुख्यमंत्री होणार असेल, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस समर्थकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी #RejectFadnavisForCM या ट्रेण्डला प्रत्युत्तर देण्यासाठी #MaharashtraNeedsDevendra या हॅशटॅगने ट्वीट करायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात ट्वीट्स करुन फडणवीस यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु या ट्वीट/हॅशटॅग वॉरमध्ये #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग पुढे होता आणि जास्तीत जास्त वेळ हा हॅशटॅग देशभरात ट्रेण्डिंगमध्ये होता. फडणवीस समर्थकांनी सुरु केलेला ट्रेण्ड केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला तर फडणवीस विरोधकांनी सुरु केलेला ट्रेण्ड देशभरात सुरु होता.
देवेंद्र फडणवीस एकाकी? मदतीसाठी इतर नेते का नाहीत? स्पेशल रिपोर्ट
मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावांची चर्चा? | Mumbai | ABP Majha