शरद पवार, वळसे पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन, पवार म्हणाले...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं.
![शरद पवार, वळसे पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन, पवार म्हणाले... NCP Leader Sharad Pawar In pune Junnar program Crowds violating corona rules शरद पवार, वळसे पाटलांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन, पवार म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/e759c18b9a6931104fdb8c8300d4aea0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते. एकीकडे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व मंत्री जनतेला गर्दी करू नका. असं आवाहन करतायेत. असं असताना शरद पवारांच्या उपस्थितीत आणि गृहमंत्री वळसे पाटील यांच्या समोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व नियम आणि आवाहन धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. सहकार महर्षी माजी आमदार स्वर्गीय शिवाजीराव महादेव तथा दादासाहेब काळे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा जुन्नरमध्ये पार पडला.
यावेळी शरद पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे लोकांना भेटणं टाळायला हवं. असे सल्ले आम्हाला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेत. पण काळे यांचा संकल्प होता. म्हणून आम्ही आलो. व्यासपीठ आणि समोरची गर्दी अंतर ठेवून आम्ही कार्यक्रम करु असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणून मी यायचं ठरवलं, असं पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, सलग 55 वर्षे सहकार क्षेत्रात निवडून येण्याची किमया कोणी साधली असेल तर ती शिवाजीराव काळे यांनी. त्यांच्या कार्यामुळे आजच्या बँका व्यवस्थित चालतायेत. माझ्याकडे केंद्रीय कृषी खातं होतं पण आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही. भाजी, टोमॅटो याचे दर खालाऊ दिले नाही. पण सध्या शेतकरी मेटाकुटीला आलाय. टोमॅटो, शिमला मिर्ची फेकून द्यावे लागले, दर कमी झाल्याने ही परिस्थिती. यासाठी लक्ष देण्याची गरज आहे असं पवार म्हणाले.
महिलांच्या उपस्थितीवर पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला का उपस्थित आहेत. आम्ही पन्नास टक्के आरक्षण आणलंय. राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज घडवले, यांच्या संस्काराने स्वराज्य घडलं. त्यामुळं या आपल्या राजमातांना संधी द्या, प्रोत्साहित करा, त्यांच्या विचारांची पिढी घडविण्यासाठी भूमिका आपण घ्यायला हवी, असं ते म्हणाले.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले आणि कोरोनाची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे असे कार्यक्रम घेता आले नाहीत. त्यातून आपण बाहेर येतोय. पण अजून ही धोका टळलेला नाही. पुण्याच्या ग्रामीण भागात खासकरून जुन्नर, आंबेगाव या तालुक्यात तर अद्याप ही कोरोनाचे बरेच रुग्ण आढळत आहेत. त्याअनुषंगाने आपण काळजी घ्यायला हवी, असं वळसे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)