(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : 'तो' झाला होता चिमुकल्यांचा खराखुरा 'बग्गीरा' पण...
मालेगाव तालुक्यात 'जंगलबुक'च्या कथेची आठवण करुन देणारी घटना घडली आहे.
नाशिक : 'जंगलबुक'मधील मोगली आणि बग्गीराची गोष्ट आठवतच असेल. हो हो अगदी तशीच गोष्ट नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली. आपल्या पोटच्या लेकराला जीव लावून लहानाच मोठं करतो, अगदी तसंच एका बिबट्याच्या बछड्याचा एक शेतकरी कुटुंबाने आठ दिवस पाहुणचार केला आहे. ही घटना संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
जिल्ह्याच्या निफाड, येवला, इगतपुरी, मालेगाव आदी भागात खाण्यासाठी आणि राहण्यासाठी जागा आणि मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या जास्त आहे. दररोज बिबट्याने हल्ला केल्याचा किंवा बिबट्या नजरेस पडल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते. बिबट्या पाळीव प्राण्यांवर आणि मनुष्यावर हल्ला करत असल्याने ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत आहे.
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे रावसाहेब गंगाराम ठाकरे यांचे शेत आहे. काही दिवसांपूर्वी यांच्या घरासमोर अंगणात सकाळी सकाळी मांजरी सारखा प्राणी मुलांना खेळताना दिसून आला. मुले त्याच्याबरोबर खेळू लागली. मात्र आजोबांच्या पाहिल्यानंतर हा बिबट्याचा बछडा असल्याचे निदर्शनास आले. यावर ठाकरे यांनी त्या बछड्यास आईच्या हवाली करण्याच्या उद्देशाने दोन तीन दिवस बाहेर ठेवले. बछड्याची आई परत आली नाही.
दरम्यान, ठाकरे यांच्या घरात असणारे बाळ गोपाळ त्यांच्याबरोबर खेळू लागले. दिवसभरात त्याला दीड लिटर दूध दिले जात होते. घरातील तीर्थ, वेदांत, तन्वी, दक्ष, अथर्व या मुलांच्या अंगाखांद्यावर तो खेळत असे. आता त्याला घरातच ठेवावे असे सर्वांना वाटू लागले होते. परंतु ते शक्य नसल्याने शेवटी आठ दिवसानंतर याबाबत वनविभागास कळविण्यात आले. त्यांनतर वन विभागाने त्यास ताब्यात घेत त्याच्यावर औषधोपचार करण्यात करण्यात आले. तर दोन दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असून नंतर त्याला मूळ अधिवासात सोडण्यात विषयी निर्णय घेतला जाणार आहे.
सदर बछडा चालण्या-फिरण्यासाठी सक्षम असला तरी सुदृढ नसल्याने औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. काही दिवस तो वन विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. बछडा मूळ अधिवासात पाठवण्या आधी त्याच्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधण्यात येऊन त्याला योग्य क्षेत्रात सोडण्याचा निर्णय घेतल्या जाणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: