(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli MIDC Blast : आईची नजर मुलाच्या वाटेकडे, 15 दिवसांपासून वयोवृद्ध आई बघतेय मनोजची वाट; डोंबिवली स्फोटात झाला बेपत्ता
Dombivli MIDC Blast : एकीकडे आईने मुलाच्या वाटेकडे नजर लावली आहे तर दुसरीकडे 11 वर्षांची मुलीनेही हंबरडा फोडला आहे. डोंबिवली स्फोटाला 15 दिवस झाले तरीही मनोज जोंधळे यांचा पत्ता नाही.
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोटाला 15 दिवस झाले आहेत. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही चार जणांचा शोध लागला नाही. त्यामध्ये मनोज जोंधळे या तरुणाचा समावेश आहे. मनोज हा बेपत्ता असला तरी त्याच्या आईला मात्र तो परत येण्याची आशा आहे. त्यामुळेच मनोजच्या आईची नजर अजून मुलाच्या वाटेकडे लागली आहे.
डोंबिवली आजदेपाडा येथे राहणारे जोंधळे कुटुंब अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये रहात आहे. या कुटुंबातील कर्ता पुरुष मनोज जोंधळे 23 मे च्या स्फोटानंतर अजूनही बेपत्ता आहे. बेपत्ता झालेल्या मनोज यांची वाट त्यांची वयोवृद्ध आई पाहात आहे. तर त्यांची 11 वर्षांच्या मुलीने पंधरा दिवसापासून पप्पा कुठे गेलेत असा सवाल करत हंबरडा फोडला आहे. मनोज त्यांच्या आईसमोरच कंपनीत कामाला गेला आणि त्या कंपनीत स्फोट झाला. हे आईला माहिती आहे. मात्र आमच्यासमोर काहीच झाले नाही, माझा मनोज कुठून तरी येईल आणि आई म्हणून आपल्याला आवाज देईल या आशेने मनोजच्या वाटेकडे आईची नजर लागून आहे.
डोंबिवली अमुदान कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोज जोंधळे हे 23 मार्च रोजी सकाळी आपल्या आईला कामात मदत करून, देवपूजा करून बाहेर पडले. आईने मनोजला जेवणाचा डबा बनवला आणि मनोज डबा घेऊन सकाळी 7:15 वाजता गेले. पण सकाळी गेलेला मुलगा अजूनही घरी आला नाही, त्याची आई अजूनही तो येण्याची वाट पाहतेय.
डोंबिवलीतील कंपनीत स्फोट झाल्यानंतर मनोजच्या आईने पहिला त्याला कॉल केला, पण त्याचा फोन बंद लागत होता. पण अजूनही आपला मुलगा घरी येईल या आशेवर त्याची आई वाट पाहतेय. रोज रात्री 8 वाजता मनोज घरी येईल असं त्याच्या आईला वाटतंय. मनोज कुठूनतरी आपल्याला आई म्हणून हाक मारेल असं त्याच्या आईला वाटतंय.
मनोज त्याच्या आईची दररोज सेवा करत होता. आता त्याच्या आईची तब्येत खराब आहे, त्यामुळे मनोज येईल आणि आधार देईल असं त्याच्या आईला वाटतंय.
मनोज जोंधळे यांची 11 वर्षाच्याची मुलगी गेली 15 दिवसांपासून पप्पांची वाट बघतेय. आमचे पप्पा कुठे आहेत असं विचारत त्या मुलीने आणि कुटुंबांनी हंबरडा फोडला.
ही बातमी वाचा: