(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : कुरियरच्या सील बंद ट्रकमधून मद्याची तस्करी, नाशिकमध्ये 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली असून या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
नाशिक: नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरातून धुळ्याकडे जात असताना 24 लाख रुपयांच्या अवैध मद्याचा ट्रक पकडला आहे. या कारवाईत एकास अटक करण्यात आली आहे.
मोहनलाल भगिरथजी बिष्णोई असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. दरम्यान नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. सदर संशयित कुरियरच्या सील बंद ट्रकमध्ये लपवून मद्याची तस्करी करत होते. मद्याच्या ट्रकसोबत एका संशयितांस ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिक पुणे महामार्गावर द्वारका सर्कल जवळ वाहन तपासणी कामी सापळा रचून ठेवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला तसेच गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्रीसाठी वैध असलेल्या मालाची वाहतूक केली जात असताना द्वारका भागात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये राजस्थानमधील एकजण ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान मद्यसाठा आणखी कुठल्या जिल्ह्यात जाणार होता? किंवा नाशिकमध्ये कुठल्या विक्रेत्याकडे नेण्यात येणार होता? माल कुणाच्या माध्यमातून विक्रीसाठी आणला जात होता? याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिकचे अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली आहे. दरम्यान नाशिक उत्पादन शुक्ल विभागाच्या या कारवाईने मद्य तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई कांतीलाल उमप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, उषा वर्मा, अर्जुन ओहोळ, विभागीय उपायुक्त, नाशिक तसेच मनोहर अंचूळे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: