Grampanchayat : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द होणार? पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण होणार
Maharashtra News : ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पदे एकत्र करून त्याऐवजी आता एकच ‘पंचायत विकास अधिकारी’ हे पद तयार केले जाणार आहे.
नाशिक: ग्रामसेवक म्हटलं की ग्रामपंचायत आणि सरपंच यातील दुवा म्हणून ओळखला जातो. ग्रामसेवकाच्या माध्यमातून नागरिकांच्या जन्म दाखल्यापासून ते मृत्यू दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रे मिळतात. मग अशावेळी जर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकच नसेल तर?
प्रश्न वाचून बुचकळ्यात पडला ना? पण हो हे खरं आहे. पुढील काही दिवसांत ग्रामपंचायतमध्ये महत्वाचा दुवा असणारे ग्रामसेवक हे पद रद्द करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
गावाचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या मदतीला असणारा सरकारी अधिकारी म्हणजे ग्रामसेवक. त्या दृष्टीने गावाच्या आर्थिक नाड्या या ग्रामसेवकाच्याच हातात असतात. मात्र ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी हे पद आता रद्द होण्याची शक्यता आहे. ही दोन्ही पदे एकत्र करून त्याऐवजी आता एकच ‘पंचायत विकास अधिकारी’ हे पद तयार केले जाणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ग्रामसेवक संघटनेकडूनही तशी होत असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
दरम्यान ग्रामसेवक संघटनेच्या मागणीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत एकच पद तयार करण्यासाठी नाशिक विभागीय उपायुक्त यांच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमण्यात आली असून रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतणश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा अभ्यास ही समिती करणार आहे. त्यानुसार नवीन पदासाठी नियम ठरवले जाणार आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदे रद्द करुन नवे पद निर्माण करण्याची गरज, त्याची कारणमिमांसा ही समिती करणार आहे. आदींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांत या समितीने आपला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी आहे समिती
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद-नाशिक, उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जिल्हा परिषद-नाशिक, ग्रामसेवक एकनाथ ढाकणे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे प्रतिनिधीची नियुक्ती केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, नाशिक यांची सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.