(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Narayan Rane | राज्यातील मंत्रालयाचं दुकान बंद, जनता दरबार नारायण राणे यांची फटकेबाजी
आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचा जनता दरबार सुरू केला आहे.
मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) आक्रमक शैलीसाठी आणि फटकेबाजीसाठी ओळखले जातात. आज झालेल्या जनता दरबारात त्यांच्या याच स्वभावाचा अनुभव आला. याआधी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आज राणेंच्या जनता दरबारामध्ये देखील असेच काही किस्से पहायला मिळाले. आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील केंद्रीय मंत्र्यांचा जनता दरबार सुरू केला. ज्याची सुरुवात केंद्रीय लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनता दरबाराने झाली. राणेंकडे असलेल्या खात्यात कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतील याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. या विभागातील अधिकारी ही माहिती उपस्थितांना सादरीकरणाद्वारे सांगत होते. मात्र याच दरम्यान अधिकारी वारंवार लघु- सूक्ष्म, आणि मध्यम उद्योग मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय, मंत्रालय असा उल्लेख करत होते. बऱ्याचदा अधिकाऱ्यांकडून हा उल्लेख आल्यानंतर राणेंनी त्यांना थांबवत कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा नाहीतर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील ज्याचे दुकान सध्या बंद असल्याचा असा खोचक टोला राणेंनी यावेळी लगावला.
अधिकाऱ्यांना म्हणाले मराठीत बोला
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सादरीकरणाची सुरुवात करताना अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सुरुवात केली. मात्र राणेंनी त्यांना हिंदी ऐवजी मराठीत बोला. तुम्ही उत्तम मराठी बोलता असे मला कळल्याचे सांगत संपूर्ण सादरीकरण मराठीत बोलायला अधिकाऱ्यांना भाग पाडले.
सगळाच खर्च केंद्राने केला तर हे इथे बसून काय करणार?
दरम्यान या जनता दरबारावेळी एका उद्योजकाने राज्यात पायाभूत सुविधा केंद्राने करून द्यावे असे नारायण राणे यांना सांगितले. यावेळी राणेंनी सगळाच खर्च केंद्राने केला तर हे इथे बसून काय करणार? असे म्हणत ठाकरे सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.