(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
चिपळूण येथील एका शैक्षणीक संस्थेत काम करत असलेल्या महिलेने मधू चव्हाणांवर फसवणूक आणि बलात्कारचे आरोप केले आहेत.
मुंबई : मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. चिपळूण येथील एका शैक्षणिक संस्थेत काम करत असलेल्या एका महिलेने मधू चव्हाणांवर फसवणूक आणि बलात्कारचे आरोप केले आहेत.
मधू चव्हाण यांनी आपल्यावर 2002 ते 2017 या कालावधीमध्ये लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार 57 वर्षीय महिलेने पोलिसांत केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मधू चव्हाण यांच्याविरोधात यापूर्वीही या महिलेने 2 वेळा याबाबतची तक्रार दिली होती. मात्र त्यावर कोणतीच विशेष कारवाई झाली नाही, त्यामुळे या महिलेने चिपळूण न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यावर न्यायालयाने चिपळूण पोलिसांना सदर महिलेची तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
मधू चव्हाण यांनी दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयात अपील केलं. मात्र हायकोर्टानेही चिपळूण न्यायालयाचे आदेश कायम ठेवल्याने अखेर पोलिसांनी या महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीच्या आधारावर चिपळूण पोलिसांनी 376, 354, 420, 509 अन्वये मधू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.