(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdul Sattar : उद्धव ठाकरेंपेक्षा आम्हाला अधिक प्रतिसाद, कृषीमंत्री सत्तारांचं वक्तव्य, आज अकोल्यात घेणार महाबीजचा आढावा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळणाऱ्या प्रतिसादापेक्षा आम्हाला मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे.
Abdul Sattar : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळणाऱ्या प्रतिसादापेक्षा आम्हाला मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा दृष्य परिणाम पुढच्या महिना-दोन महिन्यात दिसायला लागेल असंही ते म्हणाले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज अकोला (Akola) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अकोल्यात आले असता प्रसारमाध्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान सत्तार हे आज कृषी विद्यापीठ आणि महाबीजचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेणार आहेत.
अमोल मिटकरींना चांगल्या डॉक्टराकडे नेऊन तपासावं लागेल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज कृषी विद्यापीठ आणि महाबीजचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेणार आहेत. सरकार लवकरच शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणार असल्याचे देकील सत्तार यांनी म्हटलं आहे. यासाठीच 100 दिवसांचा कार्यक्रम ठरवल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारचा दृष्य परिणाम पुढच्या महिना-दोन महिन्यात दिसायला लागेल असं वक्तव्य देखील सत्तारांनी केलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर देखील सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.
अमोल मिटकरी यांना चांगल्या डॉक्टराकडे नेऊन तपासावं लागेल. मग त्यांच्यात काय फॉल्ट आहे ते समजेल असा टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला. भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या वाढत्या गाठीभेटींवर भाष्य करणं मात्र, सत्तारांनी टाळलं.
संजय शिरसाट यांच्याबद्दल अफवा
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्याबद्दल भाजप डबल गेम करत आहे असा प्रश्न सत्तार यांना यावेळी विचारण्यात आला. यावेळी सत्तार म्हणाले की, कोणीही कोणाशी डबल गेम करत नाही. संजय शिरसाट औरंगाबाद जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार आहे. त्यांच्याबद्दल अफवा उडवण्याचे काम काहीजण करत आहेत. ते चांगले आमदार आहेत. चांगले काम करत आहेत, त्यांना बदनाम करण्याचे काम जर कोण करत असतील तर त्यांना ते उत्तर देतील असे सत्तार म्हणाले.
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमाला कालपासून सुरूवात झाली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल संपूर्ण दिवस शेकऱ्यांसाठी दिला. त्यांच्यासोबत काम पाहिलं, अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांना शेती करताना काय अडचणी येतात? शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्ग का निवडतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात अब्दुल सत्तार यांनी केली आहे. विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या मेळघाटातून अब्दुल सत्तार यांनी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमाची सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यातील साद्राबाडी या गावात शैलेंद्र सालकर यांच्याकडे ते मुक्कामी राहिले होते. त्यानंतर आज लेगच सत्तार हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Abdul Sattar : कृषीमंत्र्यांचा शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, 'एक दिवस बळीराजासाठी..'
- 'एक दिवस बळीराजासाठी'... अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी, राज्यभर 90 दिवसांची मोहिम